यांना पुढची पाच वर्ष राहिलेला देश लुटायला हवी आहेत, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील कफ परेड व गिरगाव शाखांना भेटी दिल्या. यावेळी जमलेल्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर निशाणा साधला. ”गेली दहा वर्ष भाजप देश लुटत आहेत आणि आता राहिलेला देश लुटायला यांना पुढची पाच वर्ष हवी आहेत’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. या शाखा भेटींच्या वेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते.

”मी सध्या राज्यभर कुटुंब संवाद करत फिरतोय. सगळीकडे गर्दी ओसंडून वाहतेय. फटाके फोडले जात आहेत. जणू काही हा विजयाचा दौरा करतोय असं वाटतंय. आपण जो समुद्री किनारी मार्ग केला आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं गेलंय. हे स्वप्न आपण पाहिलं होतं. कोरोना काळातही हे स्वप्न बंद पडू दिलं नाही. मी, आदित्य, अरविंद, आपल्यासोबतची सगळीच लोकं वेळोवेळी पाहणी करत होतो. आज त्या रस्त्यावरून आलो. काही जण स्वप्न पाहणारे असतात तर काही स्वप्न पूर्ण करणारे असतात. मला अभिमान आहे महापालिकेचा, ते आपलं स्वप्न चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहेत. आताचे जे घटनाबाह्य सरकार आहे त्यांची तर झोपच उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाची यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. कधी ही तलवार डोक्यात पडेल व यांची खुर्ची जाईल. म्हणून घाई घाईने सर्व उरकत आहेत हे लोक. आपल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम सुरू आहे. जे स्वप्न आपण दाखवलं त्याचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे. आम्ही मुंबईकरांना बांधिल आहोत. असं कोणतंही वचन नाही जे मी पूर्ण केलेलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या या भेटीच्या वेळी कफ परेड येथील बंजारा समाजाच्या लोकांनी त्यांना विभागात सेवालाल महाराजांचं मंदिर हवे असे एक निवेदन दिले. याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आपलं सरकार येऊ द्या त्यानंतर इथे सेवालाल महाराजांच मंदिर झालं म्हणून समजा, असे आश्वासन दिले.

”उद्या लोकसभा निव़डणूकीच्या तारखा जाहीर होतील. जस जसं निवडणूक जवळ येतेय यांचं एक एक भांड फुटत चाललं आहे. नुकतंच निवडणूक रोख्यांचं भांड फुटलं. भाडोत्री जनता पक्ष जे काही बोंबलत आहेत. काँग्रेसने देश लुटला. हे निवडणूक रोखे जाहीर झाल्यानंतर सगळं समोर आलं आहे. भाजपच्या अकाऊंटमध्ये सात आठ हजार कोटी रुपये रोख्यातून जमले आहेत. त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या किती जमले ते बघा. यावरून उघड आहे की देशाला कोण लुटतंय. यांना पुढची पाच वर्ष हवी आहेत राहिलेला देश लुटायलचा आहे. लुटारुच्या हातात परत देश द्यायचा आहे का हे तुम्ही ठरवायचं आहे. शिवसैनिकांच्या मागे ईडी सीबीआय लावून भाजपात ये नाहीतर जेलमध्ये जा जसं केलं जातंय. तिच पद्धत निवडणूक रोख्यांच्या स्वरुपात देणग्या देणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत वापरली आहे. या ज्या देणगीदार कंपन्या आहेत. ज्यांनी निवडणूक रोखेच्या स्वरुपात देणग्या दिल्या. त्या मोठ मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्यावर धाडी टाकून जबरदस्तीने निवडणूक रोख्यांच्या स्वरुपात पैसे उकळले आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.