थापाड्या आणि खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळून टाकू! उद्धव ठाकरे यांची गर्जना

लोकसभा निवडणूक ही हुकूमशाही मोदी सरकारच्या नाही तर शेतकऱयांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनमरणाची आहे. आयुष्य स्वातंत्र्यात जगायचे की पारतंत्र्यात जगायचे याचा विचार करण्याची वेळ आली असून यंदाच्या निवडणुकीत थापाडय़ांची, खोटारडय़ांची भ्रमाची लंका जाळून टाकू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले.

अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वर्धा मतदारसंघातील उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी हिंगणघाट येथेही प्रचारसभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि मिंध्यांवर कडाडून हल्ला केला.

अमरावती मतदारसंघात बळवंत वानखेडे यांचा सामना महायुतीच्या नवनीत राणा यांच्याशी होणार आहे. राणा यांनी हनुमान चालिसावरून शिवसेनेवर टीका केली होती. तो धागा पकडून या वेळी उद्धव ठाकरे यांनी राणांवर निशाणा साधला. उद्या हनुमान जयंती असून अचूक मुहूर्तावर आजचा मेळावा आयोजित केला गेलाय, असा टोला त्यांनी लगावला. अमरावतीमध्ये शिवसेनेने पाच वेळा विजय मिळवला होता आणि येथील शिवसेनाप्रेमी मतदार कधीही गद्दाराला साथ देणार नाहीत आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना जे काही करते ते समोरून करते. मागून वार करणारी आमची अवलाद नाही. शिवसेना छातीवर वार झेलते आणि छातीवरच वार करते, हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख या वेळी उद्धव ठाकरे यांनी काळजीवाहू पंतप्रधान असा केला. शिवसेनेसोबत युती होती तेव्हा निवडणुकीत मोदींना महाराष्ट्रात यावे लागत नव्हते, आता गल्लीबोळात जाताहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली. कॉंग्रेस ज्यांना जास्त मुले होताहेत त्यांना सर्व संपत्ती वाटून टाकेल, अशी टीका करणाऱया पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत सत्तेवर असताना कमी मुले असणाऱयांना संपत्ती का वाटली नाही, असा बोचरा सवालही त्यांनी केला. कुणाला जास्त मुले होताहेत आणि कुणाला कमी हे मोदींना कसे कळतेय देव जाणो. कदाचित यंत्रणा त्यांच्या हातात असल्याने कळत असेल, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

अमरावती ही तुकडोजी महाराजांची भूमी आहे. त्यांची कीर्तने देशप्रेमाने ओथंबलेली होती. क्रांतिकारांना प्रेरणा देणारी होती, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांच्या रचनेतील दोन ओळी ऐकवून दाखवत भाजपवर शरसंधान केले. ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना! झाडू झडले शस्त्र बनेंगे, नाव लगेंगी किनारे!!’ असे उद्धव ठाकरे यांनी ऐकवताच सभागृहात भारतमाता की जय, असा जयघोष घुमला. भारतमातेसाठी तुकडोजी महाराजांनी त्यांच्या अमोघ वाणीतून देशप्रेम जागृत केले होते. आज जे सत्तेवर बसलेत त्यांचा मात्र स्वातंत्र्यलढय़ाशी काडीमात्र संबंध नव्हता, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर आणि माजी आमदार सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

भवानीमातेचे तेज महाराष्ट्रद्वेष्टय़ा सरकारला दाखवून द्या

शिवसेनेच्या मशालगीतामधून जय भवानी हा शब्द वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या फतव्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी या वेळी करून दिली. भवानीमातेबद्दल असलेल्या आकसाला मूठमाती देऊन भवानीमातेचे तेज काय असते ते महाराष्ट्रद्वेष्टय़ा सरकारला दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा द्या, असे आवाहन केले. त्यावर संपूर्ण सभागृह भवानीमाता आणि शिवप्रभूंच्या जयघोषाने दुमदुमून गेले.

जनताच न्याय देईल

शिवसेनेशी गद्दारी झाली आहे. शिवसेनेचे चिन्ह नाव मोदी आणि शहांनी त्यांचा जो चाकर आहे निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारांना दिले आहे. मी आज तुमच्या न्यायालयात आलो आहे. तुमच्याकडे न्याय मागतो आहे. न्याय देणार आहात की नाही तुम्ही मला, अशी साद उद्धव ठाकरे यांनी वर्ध्यातील सभेतून जनतेला घातली त्यावर हो असा आवाज गर्दीतून घुमला.

असंस्कृत माणूस सांस्कृतिक मंत्री कसा होतो?

अलीकडेच अमरावतीत झालेल्या एका मेळाव्यात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचा नटी असा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपने रान उठवले होते. त्याचाही समाचार या वेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, आम्ही जरा काही बोललो तर महिलेचा अपमान झाला असे भाजपवाले म्हणतात, मग त्यांनी सांस्कृतिक मंत्री म्हणून जनतेच्या मानगुटीवर बसवलेल्या मुनगंटीवारांनी बहीणभावाच्या नात्याचा विकृत उल्लेख केला, त्या वेळी कोणाचा अवमान झाला? असे मोदींना जाहीरपणे विचारा, असे उद्धव ठाकरे यांनी अमरावतीकरांना सांगितले. एक बीभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस दुर्दैवाने राज्याचा सांस्कृतिक मंत्री झालाय त्याच्यावर भाजपने काय संस्कार केलेत, असा सवालही त्यांनी केला. महिलेचा अपमान झाला म्हणणाऱयांनी पहिले जाऊन त्या मुनगंटीवाराच्या मानगुटीवर बसावे आणि देशातील महिलांची माफी मागावी, असेही ते पुढे म्हणाले.

शेतकऱयांचा खिसा कापून भीक देतेय भाजप, अशी राजवट हवीय का?

भाजपकडून होत असलेल्या शेतकऱयांच्या फसवणुकीचाही पर्दाफाश उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱयाने वर्षाला एक लाख रुपयांचे खत घेतले तर त्यावर अठरा टक्के म्हणजे 18 हजार रुपये जीएसटी लावला जातो. तो मोदी सरकारच्या खिशात जातो. त्यातील सहा हजार रुपये सरकार शेतकऱयांना देते. उरलेले बारा हजार रुपये सरकारच्याच खिशात राहतात. म्हणजे शेतकऱयांचाच खिसा कापून त्यांच्यावर उपकार केल्याचा आव आणला जातोय, असे सांगत, अशी राजवट पुन्हा हवी आहे का, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी जोरदार नकार दिला. मोदी गॅरेंटीवरही उद्धव ठाकरे यावेळी तुटून पडले. भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, तुमचा बालही बाका होणार नाही. पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखे तुरुंगात टाकू ही मोदी गॅरेंटी आहे, असे ते म्हणाले. अनिल देशमुख मात्र घाबरले नाहीत, झुकले नाहीत, लढत राहिले आणि आजही या लढाईत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर बसलेल्या देशमुखांचे काwतुकही केले.

हेच हात तुम्हाला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचतील

उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे, असे विधान या वर्ध्यात येऊन मोदी यांनी केले असा उल्लेख करत येथे जमलेले शिवसैनिक नकली आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तेव्हा मोदींविरुद्ध गर्दीतून चीड व्यक्त झाली. तो धागा पकडत मोदीजी, या हातांनी तुम्हाला दिल्लीचं तख्त दाखवलं होतं आणि तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

वर्ध्यातील सभेला आपचे नेते संजय सिंह, चारूलता टोकस, रोहिणी खडसे, रणजित कांबळे उपस्थित होते.

देशावर येऊ घातलेले संकट शिवसैनिक दूर करतील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची एकजूट आणि लढाऊ वृत्तीची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिक धावून जातात. आज देशावर जे संकट येऊ पाहतंय, त्या संकटांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्यामार्फत मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर प्रहार केला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वपक्षीय खासदार बसून पक्षविरहित चर्चा करतात. त्यावेळी मोदी तिथे आले तर सत्ताधारी खासदार माना खाली घालून बसतात. सेंट्रल हॉलमध्ये भाजपचे खासदार जमतात तेव्हा त्यांना फक्त मोदींचे ऐकावे लागते, बोलता येत नाही. इतकी दहशत पाहिली की देशात मोदींच्या रूपाने नवा पुतीन तयार होतोय की काय अशी चिंता वाटते, असे शरद पवार म्हणाले.

भाजपला खडय़ासारखे बाजूला करा

भाजप सत्तेवर आल्यानंतर संविधान बदलणार असल्याचे सांगितले जातेय. संविधानावर कुणी हात सरसावेल, कुणी धक्का देत असेल, त्याच्यात बदलाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशाचे प्रचंड नुकसान होईल. अशी स्थिती येऊ द्यायची नसेल तर संविधान संकटात आणणाऱया प्रवृत्तीला खडय़ासारखे बाजूला ठेवण्याचे काम उद्याच्या निवडणुकीत करा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

– पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मी अमरावतीकरांची माफी मागतो. नवनीत राणा यांना मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या होत्या. लोकांनी माझा संदेश ऐकून त्यांना खासदार केले. पण गेल्या पाच वर्षांतील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. ती चूक पुन्हा होणार नाही. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचे सार्वजनिक जीवन स्वच्छ आहे अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा.