
मुंबईतील उद्योग-रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेली धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा अदानीच्या बीकेसीतील कार्यालयावर धडकला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून भाजप, मिंधे सरकार व अदानी यांच्या घणाघात केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना जिथल्या तिथे व 300-350 नाही तर 500 स्क्वेअर फूट घरं दिलीच पाहिजे, असे सरकारला ठणकावून सांगितले. तसेच यावेळी त्यांनी ‘’आमच्या नादी लागाल तर पापडासारखं लाटून उन्हात वाळत घालू’’, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला. ज्यांनी अदानीची सुपारी घेतली आहे.
‘’50 खोके ची घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात गेली. आता यांना 50 खोके देखील कमी पडायला लागले म्हणून धारावी व मुंबई गिळायला लागलेयत हे बोके. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे. यांना वाटतंय की आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही. अदानीला प्रश्न केला की भाजप उत्तर देतं. खरंतर सरकारचा एक कार्यक्रम आहे की सरकार आपल्या दारी… पण मूळात हे सरकारच अदानीच्या दारी आहे. धारावीच्या सगळ्या एफएसआय दिला आहे यांनी. संडात बाथरुम, नाले, ओढे, गटारं सगळ्यांचा एफएसआय अदानीला देऊन टाकला. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा दिलेला नाही. ढगांची गरजच नाही. बिन ढगांचा ते सवलतीचा पाऊस पाडतायत. या ज्या सवलती दिल्या आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यांना असं वाटतंय की सब भूमी गोपाल की तसं सब भूमी अदानी की तर तसं आम्ही होऊ देणार नाही’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
‘’म्हणे उद्धव ठाकरे टीडीआरची लॉबी घेतायत. तुम्ही जे अदानीचे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय. मी मुख्यमंत्री असताना एकतरी निर्णय दाखवा जो जनतेला बाजूला ठेवून मी केवळ बिल्डरसाठी दिला. बिल्डरधार्जिने तुम्ही आहात. हा लढा केवळ धारावीचा राहिलेला नाही. हा लढा संपूर्ण मुंबई व महाराष्ट्राचा राहिलेला आहे’’, असे उद्धव ठाकरे म्हणाले
‘’अडीच वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. त्यांना खोके कुणी पुरवले. विमानं कुणी पुरवली, हॉटेल बुकींग कुणी केलं असेल. आता सर्व समोर येतंय. जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आलं, तेव्हा पहिला धावतो तो शिवसैनिक आहे. त्यांना जेव्हा कळलं की उद्धव ठाकरे यांना जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबई गिळता येणार नाही. त्यामुळे यांनी आमचं सरकार पाडलं. आता समोर येतंय की 50 खोके कुणी, कशासाठी दिले. अडीच वर्षाच्या काळात धारावीचा गळा घोटू असा एकतरी जीआर काढला का. ते जेव्हा 2018 चा काळ सांगतायत. पण 2018 मध्ये आम्ही नव्हतोच. यांचंच सरकार होतं तेव्हा. आम्ही यांना साथ देत होतो. त्यामुळे ते देवेंद्रजींचं पाप आहे. आमचं नाहीए ते पाप. ते सर्व अदानीला देत आहेत. धारावी अदानीकडे, देवनार अदानीकडे, एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट अदानीकडे दिलेलं आहे. रेक्लेमेशन, मोतीलाल नगर, आदर्श नगर, अभ्युदय सगळंच अदानीला दिलेलं आहे. राहुल गांधी म्हणाले होते, हे सुट बुट की सरकार आहे. सूट त्यांना आणि बूट आम्हाला. बूटही धारावीतही बनतात. लोणची पापड सारखे छोटे धंदेही धारावीत आहेत. त्यामुळे आमच्या जास्त नादी लागाल तर पापडा सारखं लाटून वाळत टाकू उन्हामध्ये तुम्हाला’’, अअसा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
धारावीकरांना 500 फूट घर मिळायला पाहिजे
पात्रं आणि अपात्र ठरवणारी पात्र कोण आहेत. ही कुठूनतरी येतात आणि आम्हाला अपात्र ठरवतात. कोरोनाचं सरंट आलं होतं. धारावीबाबत सगळ्यांना घाम फुटला होता. दिल्लीतून फोन आला होता. तेव्हा मी म्हटलं की तुम्ही थाळ्या वाजवा आम्ही आमचं काम करतो. धारावी कोरोनाशी लढली. कोरोनाशी लढणारी धारावी अदानींच्या शऱण जाणार का? कोरोनात कुणाला उपचार द्यायचे कुणाला नाही याबाबत पात्र अपात्र नाही केलं तर विकास करताना अपात्र ठरवणारे तुम्ही कोण. जे अपात्र ठरतायत त्यांना मिठागराच्या इथे जागा देणार. म्हणजे मिठागराची जागा देखील 99 वर्षासाठी अदानीला लीजने देणार. आतापर्यंत 50 हजार पात्र ठरवलेयत. लाखाच्या वर अपात्र ठरवलेयत. म्हणजे अपात्र असलेल्यांना मिठागराला पाठवताय. म्हणजे मिठागराचा विकास. ते देखील अदानीकडे. हे सगळं अदानीला देताय त्याचा धारावीकरांना काय फायदा होणार? फक्त 300 -350 फूट घरं? धारावीकरांना 500 फूट घर मिळायला पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. एकतर धारावी करांना जिथल्या तिथे घर मिळायला पाहिजे. रेल्वे लँडमध्ये धारावीकरांचं घऱ बांधायचं नाही. हवंतर अदानीने तिथे त्यांचं घर बांधावं, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले
धारावीचा विकास सरकारने करावा
‘’आमचा विकासाला विरोध नाही. पूर्वी म्हाडाने इथे एक कोपरा विकसित केला होता. आमच्या सरकारने बीडीडी चाळींच्या विकासाचा निर्णय घेतला. तसाच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मुंबई ही भाजपच्या जावयाला आंदन देण्यासाठी नाही
धारावीसाठी एवढी गर्दी का झाली तेच कळत नाहीए. 1960 साली मुंबईसाठी चळवळ झाली. 105 हुतात्मे झाले. उगाच कुणाचा पुतळा उभा करायचा म्हणून नाही उभारलाय तिथे फोर्टला. मुंबईसाठी ज्यांनी लढा दिला. रक्त सांडले त्यांच्या स्मरणार्थ तो पुतळा आहे. रक्त सांडायची, लढायची वेळ आली की भाजप कुठेही नसते. मग ती दंगल असो किंवा कोणताही लढा असो. पण खरेदी विक्रीची वेळ आली की हे लगेच पुढे येतात. पटपट बोलायला लागतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी व गिरणी कामगारांनी प्राणाची आहुती दिली. ती भाजपच्या जावायला आंदन देण्यासाठी दिलेली नाही. अदानीला हुंड्यात द्यायला दिलेली नाही. ही आम्ही कमावेली मुंबई आहे. या मुंबईला हात लावण्याची हिंमत केली. तोडण्याची तर भाषाच करू नका. हे मी तुमच्यासमोर बोलतोय की कारण हा प्रश्न धारावीचा नाही तर संपूर्ण मुंबईचा आहे.
अदानींच्या फायलींवर पटापट सह्यांसाठीच पालकमंत्र्यांचे पालिकेत कार्यालय
आज मुंबईचा विकास महापालिका करतेय. कोस्टल रोड पण मुंबई करांच्या पैशाने करतेय त्यावर आम्ही टोल लावणार नव्हतो पण त्यावर हे टोल लावणार आहेत. ही टोळधाडच आहे. मुंबईचा जो लढा झाला होता. संपूर्ण महाराष्ट्र मुंबई पेटला होता. त्यानंतर मुंबई मिळाली. आज त्यांनी मुंबईचा विकास निती आयोगातर्फे करायचा ठरवला होता. कशासाठी? मुंबईत कधी असं झालं नव्हतं. यांनी बिल्डर पालकमंत्री झाला आणि त्या पालकमंत्र्याचे ऑफिस महापालिकेत ठेवलं का तर अदानींच्या फायलींवपर पटपट सह्या करून द्यायला
पोलीस नाही आले तर मी स्वत: येईन
‘’धारावीत पोलिसांचे विशेष पथक ठेवलेलं आहे. सरकार येतं आणि जातं. तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडे होते तशी जनतेकडेही होते. तुमच्या सदरक्षणाय या वचनाला जागा. निवृत्त पोलीस आणि त्यांचे गुंड इथे सोडलेले आहेत. पण ही गुंडागर्दी झाली तर ती तिथेच ठेचून टाका. जर तुमच्यासोबत पोलीस नाही आले तर मी स्वत: येईन, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना दिला.
चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही
‘’आज जो माझ्यावरती आरोप होतोय. हे प्रकल्प विरोधी आहेत. मी प्रकल्पाच्या विरोधात नाही. हे माझे धारावीकर आहेत. पिढ्यान पिढ्या ते ज्या वातावरणात राहतायत ते वातावरणात अदानीने एक दिवस राहून दाखवावं. इथे उंच उंच टॉवर बांधणार हे. असे टॉवर बांधणार की एक इंचही प्रकाश घरात येणार नाही. कुबट कुबट वातावरण करून टाकणार. माझं जाहीर मागणं आहे. जिथल्या तिथे घऱ. चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
धारावीत महाराष्ट्राचा डोलारा सांभाळणाऱ्यांना घर द्या
‘’धारावीमध्ये तुम्हाला 100 कोटींच्या वर टीडीआर मिळतोय. यांच्या पिढ्यान पिढ्या बसून खातील एवढा टीडीआर मिळतोय. हा विकास करायचा असेल तर मग या धारावीत माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, गिरणी कामगारांना, सफाई कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. त्या सर्वांना घरं द्या ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा डोलारा आहे. मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे हे त्यांना पचत नाहीए. त्यामुळे मुंबईला चिरडायचं कसं,मुंबईतील सगळं गुजरातला नेतायत. वर्ल्डकपचा सामना देखील गुजरातला पळवला. एका दिवसाच्या मॅचमध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली ते पाहून काही जणं हसतानाचे फोटो व्हायरल झाले. ते आपण सर्वांनी पाहिले. त्यांना हिंदुस्थान जिंकेल की हरेल याच्याशी काही घेणं देणं नव्हतं.
धारावीत आर्थिक केंद्र आणायचा माझा प्लॅन
गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसऱं केंद्र मला धारावीत हवं आहे. हाच माझा प्लान आहे. जे आर्थिक केंद्र इथे होणार होतं ती जमिन यांनी बुलेट ट्रेनला दिली. ती बुलेट ट्रेनही गुजरातला जाणारी. मग मुंबईत राहिलं काय. मुंबईचा पूर्ण चोथा करायचा, नासवून टाकायची. मग पुन्हा मुंबईची बदनामी करायची की कोरोना काळात सगळ्यात मोठा भ्रष्टााचार झाला. पण हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्याआधी तुमचा जो पायजमा सुटलाय तो आधी वर घ्या. महापालिकेत दीड वर्षात केलेले घोटाळे बाहेर काढले, रस्ता घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळे त्याची चौकशी कधी होणार. सेबीने करावी याची चौकशी. समझने वालो को इशारा काफी आहे. हा आवाज दिल्ली अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज त्यांचे चेले, भाडोत्री, दलालापर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर तो तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
– घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे.
– जिथल्या तिथे घर मिळाले पाहिजे. पात्र अपात्र विभागणी नसावीय
– व्यवसायाला जागा दिली पाहिजे
– कोळीवाडा, कुंभारवाड्याचं सीमांकन करा

























































