
सोलापूर जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिके आणि शहरातील नागरिकांची तहान भागविणारे उजनी धरण थकबाकीच्या ओझ्याखाली दबले आहे. महापालिकेकडे तब्बल 140 कोटींची, तर शेतकऱयांकडे 78 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पाणीपट्टीतून मिळणाऱया रकमेतून प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती केली जाते. मात्र, थकबाकीत वाढ होत असल्याने त्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱयांनी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सध्या उजनीतून शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. अंदाजित चार टीएमसी पाणी सध्या दोन्ही कालव्यांतून सोडण्यात आले आहे. उन्हाळा, हिवाळ्यात शहरातील नागरिकांसाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाते. वर्षातून जवळपास पाचवेळा पाणी सोडले जाते. मात्र, वापरलेल्या पाण्याची रक्कम महापालिकेने दिलेली नाही. अडचणीच्या काळात धरणाची सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शहरातील नागरिकांना मोठी मदत झाली आहे. पाणी वापरणाऱयांनी वेळेत पाणीपट्टी भरल्यास प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती वेळेत करणे शक्य होणार आहे. मात्र, महापालिकेने मागील काही वर्षांत थकबाकी भरली नसल्याने अडचणी वाढल्या आहेत, असे उजनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शेतकऱयांनी व महापालिकेने वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, शेतकऱयांनी ठिबक सिंचनचा वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज नाळे यांनी केले आहे.
पुण्यातील पावसाने उजनी प्लसमध्ये
सोलापूर जिल्ह्यात अजूनपर्यंत विशेषतः धरणपट्टय़ात पाऊस झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण मायनसमधून प्लसमध्ये आले आहे. सध्या धरणात 60 टीएमसी पाणासाठा आहे. खरीप पिकांसाठी उजव्या व डाव्या कालव्यातून सध्या चार टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. डाव्या कालव्याअंतर्गत येणाऱया पिकांना पाणी मिळाले असून, काही दिवसांत या कालव्याचे पाणी बंद केले जाणार आहे. तर दोन्ही कालव्याचे पाणी पुढील 15 दिवसांपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

























































