वेलकम टू हेल… युक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यात बंकर्समध्ये सात दिवसांत 100 मुलांचा जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरू आहेत. रशियन तोफा आग ओकत आहेत. रस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. सर्वत्र हाहाःकार उडाला आहे. अशा परिस्थितीत युक्रेनच्या रुग्णालयांत जमिनीखालील बंकर्समध्ये आशेचे किरण दिसू लागले आहेत. गेल्या सात दिवसांत या बंकर्समध्ये 100 बालकांचा जन्म झाला आहे.

युद्धामुळे युक्रेनच्या रुग्णालयांनी जमिनीखाली बंकर्स बनवले आहेत. त्यात रुग्णांवर उपचार होत आहेत तसेच महिलांच्या प्रसूती होत आहेत. मुलाचा जन्म म्हणजे आईवडिलांसाठी आनंदाचा क्षण. पण युक्रेनी मातापिता बंकर्समध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल चिंतेत आहेत. कारण बॉम्बचे आवाज, सायरनचे आवाज ऐकू येताच ही मुले रडू लागतात.

बंकर्समधील नवजात बाळांची छायाचित्रे जगभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आहेत. एका छायाचित्रात आई आपल्या मुलाला घेऊन उभी आहे. तिच्या चेहऱयावर आनंदही आहे आणि दुःखाची लकेरही उमटली आहे. आपल्या बाळाचे स्वागत करताना कदाचित तिच्या मनात ‘वेलकम टू हेल’ असे शीर्षक या छायाचित्राला देण्यात आले आहेत.