उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात बंदीची ‘अजान’; मशिदीवरील भोंगे बंद करा, पहाटे झोपेचे खोबरे होते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाने पहाटेच्या साखरझोपेचे खोबरे होते. भोंग्यांची कर्णकर्कशता लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवते. त्यामुळे बंद करा हे भोंगे! अशी बंदीची ‘अजान’ उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंग्यांची दिशा बदलण्यात आली आहे तर कर्नाटकात रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंग्यांचा आवाजच बंद करून टाकण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अलाहाबादेत भोंग्यांची दिशा बदलली; आवाजही कमी केला

प्रयागराज ः उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या घराजवळील मशिदीवरील भोंग्यावरून मोठय़ा आवाजात दिल्या जाणाऱया अजानमुळे अक्षरशः हैराण झाले होते. त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱयांकडे त्याबाबत पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मशिदीच्या प्रशासनाने भोंग्याची दिशा बदलली. इतकेच नव्हे तर आवाजही कमी केला.

अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांच्या घराजवळ ही मशीद आहे. मशिदीवरील भोंग्यांचे तोंड श्रीवास्तव यांच्या घराच्या दिशेने होते. रोज पहाटे त्यावरून अजान व्हायची. त्या आवाजाने श्रीवास्तव यांची नेहमी झोपमोड व्हायची. ‘आपण कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. भोंग्याशिवायही अजान दिली जाऊ शकते जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही आणि त्यांची दिनचर्या बिघडणार नाही. ईदपूर्वीही हे लोक घोषणा सुरू करतात. ती पहाटे चार वाजता दिली जाते. त्यामुळे लोकांना त्रास होतो. संविधानाने प्रत्येकाला शांततेने राहण्याचा अधिकार दिला आहे.’ असे पत्र त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱयांना दिले होते. 2020 मध्ये याच संदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील आदेशाचा हवालाही त्यांनी या पत्रात दिला होता.

आवाज 50 टक्क्यांनी कमी केला

कुलगुरू श्रीवास्तव यांच्या या पत्राची जिल्हा दंडाधिकाऱयांनी गंभीर दखल घेतली. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर संबंधित मशिदीच्या समितीने श्रीवास्तव यांनी आक्षेप घेतल्याने त्यांच्या घराच्या दिशेने असलेल्या भोंग्यांची दिशा बदलली गेल्याचे तसेच भोंग्यांचा आवाज 50 टक्के कमी करण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी मशिदीवर चार भोंगे होते परंतु जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने त्यातील दोन हटवले गेले होते असेही समितीने सांगितले. त्यानंतर श्रीवास्तव यांनी ‘आता त्या भोंग्यांच्या मोठय़ा आवाजाने हैराण झालेल्या लोकांना शांतता लाभेल’ अशी प्रतिक्रिया दिली.

रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कर्नाटकात आवाज बंद

बंगळुरू ः कर्नाटकात मशिदी आणि दर्ग्यांवरील भोंगे यापुढे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत आवाज करणार नाहीत. कर्नाटक वक्फ बोर्डानेच त्यांचा आवाज बंद केला आहे. भोंग्यांच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंग्यांचा वापर करता येणार नाही असे पत्रक वक्फ बोर्डाने जारी केले आहे.

19 डिसेंबर 2020 रोजी कर्नाटक वक्फ बोर्डाची 327 वी बैठक पार पडली होती. त्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 9 मार्च रोजी हे पत्रक जारी  करण्यात आले. वक्फ बोर्डाच्या आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

सरकारी निर्देशांचा हवाला

ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियम हे सर्वांसाठी आहेत. त्यात डेसिबल्सची मर्यादाही देण्यात आली आहे. मशिदी आणि दर्ग्यांनी त्या नियमांचे पालन केले पाहिजे असे निर्देश जुलै 2017 मध्ये कर्नाटकातील तत्कालिन सिध्दरामय्या सरकारने दिले होते. त्याचाही उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे.

अजान, घोषणांसाठीच वापर करा!

प्रत्येक मशिद आणि दर्ग्यावर भोंगे असतात. त्यांचा वापर फक्त अजान आणि महत्वाच्या घोषणांसाठीच करण्यात यावा. सामान्य घोषणांसाठी भोंग्यांचा वापर करण्यास मनाई असेल असेही या पत्रकात वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.

मशिदींचा आक्षेप…नमाज पठण महत्वाचे

वक्फ बोर्डाच्या या पत्रकाला काही मशिदींनी आक्षेप घेतला आहे. बंगळुरूच्या खतीब-ओ-इमाम मशिदीचा त्यात समावेश आहे. त्या मशिदीचे मकसूद इमरान यांनी आपल्याला वक्फ बोर्डाचे पत्रक मिळाल्याचे सांगितले. मात्र इस्लाममध्ये सकाळचे नमाज पठण महत्वाचे असल्याने वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी त्यात बदल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.