मुंबईला धोक्याचा इशारा, आणखी दोन फॉरेन रिटर्न प्रवासी कोरोनाबाधित !

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘बीएफ-7’ने थैमान घातलेल्या देशातून आलेले आणखी दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह  आल्याने मुंबईला धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्यामुळे ‘फॉरेन रिटर्न’ कोरोनाबाधित प्रवाशांची संख्या तीन झाली आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि गोव्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून मागील काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधित आढळलेल्या 62 बाधितांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान, पुणेकडे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.

चीनसह सहा देशांमध्ये कोरोना व्हेरिएंट ‘बीएफ-7’च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जगभरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर थर्मल क्रिनिंग, लक्षणे असलेल्यांची ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करण्यात येत आहे, तर ‘बीएफ-7’चा प्रभाव नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांमधील किमान 2 टक्के प्रवाशांची ‘आरटी-पीसीआर’ आणि इतरांची सरसकट थर्मल क्रिनिंग करण्यात येत आहे. बाधित देशातून आलेल्यांना मागील 72 तासांतील ‘कोरोना निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक आहे. शिवाय हा अहवाल 1 जानेवारीपासून ‘एअर सुविधा’ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

…तर दररोज दीड लाख चाचण्या

 कोरोना आटोक्यात असल्यामुळे पालिकेकडे सद्यस्थितीत सुमारे तीन हजार चाचण्या होत असून किमान 5 ते 10 कोरोनाबाधित आढळत आहेत. मात्र ‘बीएफ-7’चा प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढल्यास पालिका दररोज दीड लाख कोरोना चाचण्या करू शकेल अशी क्षमता असल्याची माहितीही डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

 देशांत ‘बीएफ-7’चे थैमान, चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड

‘बुस्टर’साठी लसीची कमतरता

  • नव्या व्हेरिएंटमुळे दोन डोस घेतले असले तरी ‘बुस्टर’ डोस घ्यावा लागेल, असा सल्ला आरोग्यतज्ञांकडून देण्यात आला असताना मुंबईत पात्र 92 लाख लाभार्थ्यांपैकी केवळ 15 टक्के लाभार्थ्यांनीच ‘बुस्टर’ डोस घेतला आहे. यातच पालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे केवळ 9 हजार डोस शिल्लक आहेत.
  • मात्र कोव्हिशिल्ड आणि कोरबोव्हॅक्सचा एकही डोस नाही. त्यामुळे ‘बुस्टर’ कसा देणार असा प्रश्न पालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आवश्यक डोस उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला पत्र दिले आहे. दरम्यान, खासगी केंद्रांवर मात्र सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन उपलब्ध आहेत.