उरणच्या पोस्ट कार्यालयाची दुरवस्था, इमारत धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत, न्हावाशेवा

उरण तालुक्यातील भारतीय डाकघराच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.त्यामूळे अशा धोकादायक, जीर्ण झालेल्या इमारती मधून भारतीय डाकघराचा कारभार इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा असे आदेश उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सदर इमारतीच्या मालकाला व पोस्ट कार्यालयाला दिले आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पोस्टाचे कर्मचारी जीव टांगणीला ठेवून कामाचा रेटा हाकत आहेत. पावसाळ्यात तर या इमारतीला सर्वत्र गळती लागत असल्याने कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किल होते.

उरण तालुक्यातील हे मुख्य कार्यालय असून या कार्यालयात रोज शेकडो ग्राहक आपल्या विविध कामांसाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी येत असतात. मात्र इमारतीत प्रवेश केल्यानंतर या इमारतीचे धोकादायक चित्र पाहिल्यानंतर या धोकादायक इमारतीत आपले व्यवहार व जमा पुंजी कशी सुरक्षित राहिल असा प्रश्न येथे येणाऱ्या ग्राहकांना पडल्याशिवाय राहत नाही. यासंदर्भात उरण भारतीय डाकघराचे सब.पोस्ट मास्तर एम.एम.सोरते यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की भारतीय डाकघराचे कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत असून या कार्यालयात १५ कर्मचारी काम करीत आहेत. सदर इमारत धोकादायक असल्या संदर्भात कार्यालयाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गाने सदर इमारतीची पाहणी केली आहे आणि उरण शहरात इतरत्र सुरक्षित ठिकाणी कार्यालय हलविण्याचे या कार्यालयाला आदेशही दिले. आम्ही इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा पाहिली परंतु आयत्यावेळी जागा (रूम)मालकांनी जागेचे वाढीव भाडे द्यावे लागेल असे सांगितल्यामुळे कार्यालय इतरत्र सुरक्षित हलविता आले नाही. उरण नगरपरिषदेने देखिल ही इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे.