
सामना प्रतिनिधी। उरण
सामान्य आणि मध्यमवर्गीयांचे संसार उद्ध्वस्त करणारी लेडीज बार विकृती पनवेलसह महाराष्ट्रातूनच हद्दपार करण्यात यावी, असा ठराव आज शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत मांडण्यात आला. तो सर्वांनुमते एकमुखी मंजूर करण्यात आला.
लेडीजबार विकृतीला कायमचा पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने तातडीने अधिसूचना काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढावा, हे हेतूने पनवेल संघर्ष समितीने पुढाकार घेऊन आज, बुधवारी ( 30) शासकीय विश्रामगृहात बोलाविलेल्या बैठकीला पनवेल, उरण, पेणमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी लेडीज बार विकृती महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावी, असा ठराव मांडला. त्या ठरावाला ज्येष्ठ साहित्यिक, रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील आणि प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तथा शेकापचे सहचिटणीस आर. डी. घरत यांनी अनुमोदन दिले.
तर लेडीजबार सुरू करण्यासाठीच बार असोशिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा लाखाचा धनादेश दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोका निर्माण झाल्याने तो धनादेश राज्य शासनाने परत करावा, अशा आशयाचा ठराव आर. डी. घरत यांनी मांडला. त्या धनादेशाबाबत योग्य ती माहिती घ्यावी, असे सांगत पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड आणि ज्येष्ठ सामाजिक नेते हरिष बेकावडे यांनी अनुमोदन देवून ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला. आज झालेल्या बैठकीतील दोन्ही ठरावाच्या प्रती राज्याचे मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती कडू यांनी उपस्थितांना दिली.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे लेडीजबार संदर्भातील अपयश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि लेडीज बार विकृती महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावी, याकरीता पनवेलमध्ये लवकरच निषेध सभेचे आयोजन करण्याचे सर्वांनुमते ठरले. त्यासंदर्भात अंतिम निर्णय, वार, तारीख, वेळ, ठिकाण ठरविण्यासाठी पुढील रविवारी सकाळी 10.30 वाजता पुन्हा नियोजनाची बैठक शासकीय विश्रामगृहात बोलाविण्यात आली आहे.
पनवेलकरांचा बारविरोधी आवाज राज्य सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या, खा. सुप्रिया सुळे, दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, शिवसेनेच्या उपनेत्या, आ. निलम गोर्हे, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांना पाचारण करण्यावर एकमत झाले असून त्यांची उपस्थिती लाभावी, असे प्रयत्न करून निषेध मोर्चा सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक तथा रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लेडिजबार विरोधी मोहिम तीव्र करण्याचा निर्धार केला.

































































