
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणी करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. अमेरिकेतील खासदार स्कॉट पेरी यांनी हा प्रस्ताव गुरुवारी मांडला. त्यामुळे पाकिस्तानवर अधिक दबाव वाढला आहे.
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयस्थान बनला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना निवारा देतो त्याविरोधात अमेरिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्कॉट पेरी यांनी पाकिस्ताननेच या दहशतवादी तळांवर कठोर कारवाई करत सर्वं तळे उद्ध्वस्त करावी असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडतेवेळी स्कॉट पेरी यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची देखील निंदा केली. या आत्नघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. तसेच या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.
पेन्सिलवेनियाचे रिपब्लिकन काँग्रेसचे स्कॉट पेरी यांनी प्रस्ताव मांडताना आता पाकिस्तान सरकारला जबाबदार ठरवण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. या भागातील दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचे अमेरिकेचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असून देखील पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कायम सहानुभूती दाखवण्यात येते, हा इतिहास असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हंटले. दहशतवादी हल्ल्यांत निष्पाप लोकांचा बळी जातो आणि तरी पाकिस्तान या दहशतवाद्यांना जवळघेतो. आता पाकिस्तानने या गोष्टी थांबवून दहशतवाद्यांविरोधात पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.




























































