अंदमानात हत्या झालेल्या अमेरिकी पर्यटकाचा मृतदेह मिळण्याची आशा धूसर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पोर्ट ब्लेयर

अंदमानच्या उत्तरेकडील सेंटिनल बेटावर सेंटीनलीज या आदिवसींनी अमेरिकी पर्यटक जॉन एलन चाऊ याची हत्या केली होती. त्यांच्या हत्येला आठवडा उलटल्यानंतरही त्यांचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यांचा मृतदेह मिळण्याचा आशा आता धूसर झाली आहे. चाऊ यांनी 16 नोव्हेंबरला सात मच्छिमारांसह या बेटावर प्रवेश केला होता. त्यांनी प्रवेश केल्यावर बिथरलेल्या आदिवासींनी बाण आणि भाले फेकून चाऊ यांची हत्या केली होती. चाऊ यांचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आदिवासींच्या या बेटावर हेलिकॉप्टरही पाठवले होते. मात्र, आदिवासींकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भितीने हेलिकॉप्टर तेथे उतरू शकले नाही. त्यामुळे अजूनपर्यंत लष्कराचे जवान आणि पोलिस यांना चाऊ यांचा मृतदेह सापडलेला नाही.

या बेटावर वारंवार घुसण्याचा प्रयत्न केला तर या आदिवासींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या आदिवासींना हत्येचे आरोपी मानू शकत नाही. आधुनिक जगापासून ते खूप लांब आहेत. त्यांचे जगच वेगळे आहे. त्यांना या जगातील घडामोडींची कोणतीच माहिती नाही. आपल्यासारख्या माणसांना बेटावर आल्याचे पाहून त्यांच्यात असुरक्षेची भावना निर्माण होते. त्यामुळे ते हल्ला करतात असे तज्ज्ञांनी सांगितले. चाऊ यांचा मृतदेह शोधण्यासाठी या आदिवासींच्या जीवनात हस्तक्षेप करू नये, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जगभरातून अशा आदिवासींच्या जाती लुप्त होत आहेत. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे हिंदुस्थाननेही या बेटावर आपला अधिकार सांगितला नाही किंवा या भागात शासनव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला नाही. बाहेरून येणाऱ्यांवर ते हल्ले का करतात असा सवालही आदिवासींना विचारण्यात आलेला नाही. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे बेट संरक्षित घोषित करण्यात आले असून आदिवासींना बाहेरील जनतेचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. चाऊ यांच्या हत्येनंतर हेलिकॉप्टर उतरवण्यात अपयश आल्याने दोन वेळा बोटी पाठवून चाऊ यांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. या शोधमोहिमेत आदिवासींना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांनी हल्ला करू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना चाऊ यांचा मृतदेह शोधणाऱ्या पथकाला देण्यात आल्या आहेत.