
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीची आम आदमी पक्षासोबतही युती होण्याची शक्यता आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रीय लोक दलानंतर (आरएलडी) सपा आणि आपमध्ये युती होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
लखनौ येथील लोहिया ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. अखिलेश यादव हे ‘मिशन-2022’ डोळ्यासमोर ठेवून मोठय़ा पक्षांऐवजी छोटय़ा पक्षांशी युती करण्यावर भर देत आहेत. त्यांनी मंगळवारी आरएलडीला 36 जागा देऊन युती निश्चित केली आहे. याशिवाय सपाची ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीशी युती झालेली आहे. आपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंह यांनी अलीकडेच सपाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवस सोहळ्याला हजेरी लावली होती.






















































