
फाटलेल्या जीन्सच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर चौफेर टीका झाली. आता रावत यांनी माफी मागितली. तरी फाटलेल्या जीन्सवर आपल्याला आक्षेप आहे असेही रावत म्हणाले.
मुलांवर होणाऱ्या संस्काराला आईवडीलच जबाबदार असतात. मग प्रवासात मुलाला घेऊन फिरणारी महिला जर फाटकी जीन्स घालून प्रवास करीत असेल तर ती मुलांवर कसले संस्कार करणार? असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी केले होते.
त्यांच्या या वक्तव्यावरून चौफेर टीका झाली होती. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांनी ट्विटरवर #RippedJeans हा ट्रेंड चालवला होता. आता मुख्यमंत्री रावत यांनी एक पाऊल मागे टाकत माफी मागितली आहे.
रावत म्हणाले की “मी एका ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा चुकून पँट फाटायाची. गुरूजी शिक्षा देतील या भितीने आम्ही लपवायचो. आता कुठलेही तरुण तरुणी दुकानात जातात आणि दोन, चार हजारांची जीन्स पँट विकत घेतात. विकत घेण्यापूर्वी जीन्स फाटली आहे की नाही हे ते पाहतात आणि फाटली नसेल तर घरी जाऊन कैचीने ते फाडतात. तर मी जे काही बोललो त्यात चुकीचे काय?”
तसेच कुटुंबात संस्कार आणि शिस्त असेल तर मुलं कधीच अयशस्वी होत नाहीत. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान मिळता कामा नये असे मी म्हटलं तर त्यात काय चुकीचे असे रावत म्हणाले.
हे नियम माझ्या मुलांनाही लागू असल्याचे रावत म्हणाले. तसेच वातावरण आणि संस्कार कसे असले पाहिजे याबाबत मी बोलत होतो कारण कार्यक्रम आणि विषयच तसाच होता.
मग तुम्हाला जीन्सवर आक्षेप आहे का? या प्रश्नावर रावत म्हणाले की, मला जीन्सवर नाही तर फाटलेल्या जीन्सवर आक्षेप आहे. मी स्वतः पूर्वी जीन्स वापरायचो. माझ्या वक्तव्यामुळे कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो असे रावत म्हणाले.




























































