
उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील बालसुधारगृहात 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याने खळबळ माजली आहे. गंभीर म्हणजे या प्रकरणात सुधारगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधारगृहात निरीक्षकांनी भेट दिल्यानंतर एका अधिकाऱ्याला पीडितेने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सुधारगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे.
या दोघी पीडितेला सुधारगृहाच्या बाहेर घेऊन जात असत. तिथे एका घरात तिच्यावर अनेकदा विविध पुरुषांकडून बलात्कार करण्यात आला, अशी माहिती पीडितेने दिली आहे. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर म्हणजे यातील एक कर्मचारी महिला राज्याच्या महिला आणि बालकल्याण तसंच पुनर्वसन केंद्राच्या होमगार्ड विभागातर्फे तैनात करण्यात आली होती. तिला परत बोलवण्यात आलं आहे. मात्र तिच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दोन निष्पक्ष सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती उत्तराखंडच्या महिला आणि बालकल्याण मंत्री रेखा आर्य यांनी दिली आहे.






















































