
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या स्तनदा मातेच्या दुधामध्ये पुरेशा प्रमाणात अॅण्टीबॉडीज असतात. त्यामुळे लसवंत मातेचे दूध बालकांसाठी संजीवनी ठरणारे आहे, असा दिलासादायी निष्कर्ष अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोरोनाची लस स्तनदा मातेबरोबरच मुलांचेही संसर्गापासून तितकेच चांगले रक्षण करू शकते, असे या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे.
‘ब्रेस्ट फिडिंग मेडिसिन’ नावाच्या जर्नलमध्ये सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेणे किती फायदेशीर आहे हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. फ्लोरिडा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक जोसेफ लार्किन यांनी बुधवारी या सर्वेक्षणातील विविध निष्कर्षांना दुजोरा दिला. स्तनपान करणाऱया मातांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली की अशा मातांच्या दुधामध्ये सार्स-सीओव्ही-2 या विषाणूशी लढण्यासाठी अॅण्टीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ होते. लस घेणारी स्तनदा माता आपल्या मुलांचीही प्रतिकारशक्ती वाढवते हे आमच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून सिद्ध होते, असे लार्किन यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळी मूल जन्म घेते त्यावेळी त्या मुलामध्ये इम्युनिटी सिस्टम (प्रतिकारशक्ती) विकसित झालेली नसते. त्यामुळे नवजात बालकांना संसर्गाशी लढणे मुश्कील होते. तसेच विविध प्रकारच्या औषधांना योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यासही नवजात बालके कमी पडतात. मुलांच्या या नाजूक काळात लस घेतलेल्या आईचे दूध बाळामध्ये पुरेशा प्रमाणात ऍण्टीबॉडीज तयार करू शकते, असे सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद केले आहे.

























































