
‘वाचनवेडा’ हा वाचनाची आवड असणाऱया मंडळींचा फेसबुक ग्रुप आहे. काही वर्षांतच साडेतीन लाख लोक या ग्रुपशी जोडले गेले आहेत. लोकांनी वाचावं, वाचलेलं शेअर करावं, हा वाचनवेडा ग्रुपचा उद्देश आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘वाचनवेडा’ ग्रुप आता कल्पक बुकमार्क छापून वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. ‘पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपल्याला घेऊन जाणारी जहाजे आहेत’, ‘तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल’, ‘अजून एक पान वाचून मग कामाला लागू’ असे भन्नाट मेसेज या बुकमार्कवर आहेत.
अभिनेते विनम्र भाबल हे वाचनवेडा ग्रुपचे ऍडमिन आहेत. त्यांच्या पुढाकाराने हा ग्रुप सुरू झाला आहे. बघता बघता लाखो वाचनप्रेमी या ग्रुपशी जोडले गेले. वाचनवेडय़ा लोकांसाठी बुकमार्क ही विनम्र भाबल यांचीच संकल्पना आहे. त्यांनी डोंबिवलीच्या कनक वाइकर हिच्याकडून बुकमार्क डिझाईन करून घेतले आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत बुकमार्क आहेत. माफक दरात हे कल्पक बुकमार्क वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचनवेडा ग्रुपच्या वाटचालीबद्दल विनम्र भाबल म्हणाले, केवळ फेसबुकवर मर्यादित न राहता आता आम्ही विविध शहरांत जाऊन ग्रुप सदस्यांना भेटत आहोत. त्यांच्याशी संवाद साधत आहोत. वेगळे काही उपक्रम किंवा ग्रुपचे संमेलन होऊ शकते का, यादृष्टीने विचार करत आहोत.

























































