
मराठय़ांच्या समृद्ध इतिहासातील एक महान आणि सर्वोच्च निष्ठावंत जोत्याजी कृष्णाजी केसरकर. छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात सापडतो. जोत्याजी केसरकर हे कोल्हापुरातील पुनाळ गावचे. छत्रपती संभाजी राजांना धोक्याने कैद केले गेले. त्यावेळी रायगडाच्या रक्षणार्थ जोत्याजींनी घोडी सज्ज करून 100 मावळ्यांसह चाल केली. छत्रपती संभाजी राजांना वीर मरण आल्यानंतर येसूराणी आणि बाळ शिवाजी राजांसह जोत्याजी स्वतहून कैद झाले. जवळजवळ 18 वर्ष शाहूराजांच्या सोबत जोत्याजी केसरकर ढालीसारखे उभे राहिले. जोत्याजींनी शाहू राजांच्या मनात स्वराज्याची धग आणि मावळ्यांच्या पराक्रमाची कथा कायम ठेवली. शाहू राजांचे शिक्षक म्हणून जोत्याजींनी योग्य कामगिरी पार पाडत शाहू राजांच्या रूपाने एक सक्षम आणि धोरणी, राजकारणी, कार्यक्षम राज्यकर्ता घडवला. कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या गावात छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि मराठा साम्राज्याचे शूर सरदार वीर जोत्याजी केसरकर यांची समाधी आहे.





























































