
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काळय़ा पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ दिला जात नाहीच, उलट ‘दहशतवादी’ ठरवण्याचा संतापजनक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एका पाठय़पुस्तकात सावरकरांविषयी ‘दहशतवादी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकात सावरकरांसंबंधित जहालवादी, दहशतवादी असे शब्द वापरण्यात आले आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष बीएच्या मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात सावरकरांना थेट दहशतवादीच ठरविल्याने सावरकरप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर आक्षेपही नोंदविला असून मुक्त विद्यापीठाने सावरकरांविषयी असलेला आक्षेपार्ह भाग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुस्तक 2001 साली छापण्यात आले होते. केवळ मराठी माध्यमाच्या पुस्तकातच सावरकरांविषयी असा उल्लेख आहे.
पुस्तकात सुधारणा होणार
जहालवादी, दहशतवादी हे शब्द थेट सावरकरांना उद्देश वापरण्यात आलेले नाहीत असे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी स्पष्ट केले. आम्हाला अनावश्यक वाद निर्माण करायचा नसून हा उल्लेख वगळून पुस्तकात सुधारणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांचा दहशतवादी उल्लेख खपवून घेणार नाही
स्वातंत्र्यसैनिकांकडून तरुणांना नेहमीच प्रेरणा मिळत असते. इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यसैनिकांचा ‘दहशतवादी’ उल्लेख खपवून घेतला जाणार नाही, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वैभव बावनकर यांनी सांगितले. तर सुमारे 70 वर्षांपूर्वी हे शब्द वापरले जायचे. आजही तेच शब्द कायम ठेवणे चुकीचे असून आम्ही चूक मान्य करतो, असे मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक संचालक नारायण मेहेर म्हणाले.































































