
बिहारमध्ये तरुणांचे अपहरण करून बंदुकीच्या धाकावर त्यांचे तरुणींशी लग्न लावून देण्याचे भयंकर प्रकार अनेकदा समोर आले आहेत. नुकताच बिहारमधील बेगुसरायमध्ये देखील असा प्रकार एका डॉक्टरसोबत घडला आहे. गुरांना तपासण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टरचे त्या घरातील मुलीसोबत लग्न लावून दिले आहे.
सत्यम झा असे त्या डॉक्टरचे नाव असून तो तेघरा तालुक्यातील पिडौली गावात त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. सोमवारी संध्याकाळी त्याला एक फोन आला. त्यानंतर त्याने एका गुराला तपासायला जायचे असल्याचे सांगून तो घरातून निघाला. सत्यम मोर्टार गावातील एका घरात गुरांना तपासायला गेला होता. त्यावेळी त्या घरातल्या व्यक्तींनी त्याचे घरातील एका मुलीसोबत बळजबरीने लग्न लावून दिले.
दरम्यान सत्यम रात्री परत न आल्याने त्याचे आई वडील शोधाशोध करू लागले. त्या दरम्यान या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
” आता पर्यंत पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार सत्यम अनेकदा सदर घऱात गुरांना तपासायला जायचा. तिथली एक मुलगी व तो एकमेकांना पसंत करायचे. सोमवारी देखील त्याला गुरांना तपासण्यासाठी बोलावण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्याचे लग्न लावून देण्यात आले. आता हे लग्न जबरदस्ती लावून दिले की मर्जीने लावले हे सत्यम स्वत: चौकशीदरम्यान सांगेल”, असे पोलिसांनी सांगितले.




























































