
आत्रेय संस्थेतर्फे यंदाचा ‘शिरीष पै’ पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, स्त्रीमुक्ती चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना प्रदान करण्यात आला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे विद्या बाळ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने ‘मिळून सार्याजणी’ मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानवी मुक्तीसाठी स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पितृसत्ताक, पुरुषप्रधान व्यवस्थेतील पुरुषपणा आणि बाईपणा याला ओलांडून काम केले पाहिजे, असे मत गीताली यांनी यावेळी व्यक्त केले.
‘शिरीष पै’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिरीष पै सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कवयित्री उषा मेहता, राजेंद्र पै उपस्थित होते. शिरीष पै यांचा प्रवास संघर्षमय राहिला. ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार त्यांनी मराठीत रुजवला. त्यांची वृत्ती निसर्गावर, माणसांवर, प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करणारी होती. त्यामुळेच त्या चांगल्या हायकू लिहू शकल्या, असे मत उषा मेहता यांनी व्यक्त केले.
यावळी मधुकर भावे यांनी शिरीष पै यांच्या लेखांचे संपादन केलेल्या ‘अष्टपैलू शिरीष पै व्यक्तिदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन मेहता यांच्या हस्ते झाले. तसेच ‘मिळून सार्याजणी’ मासिकाच्या डिसेंबरच्या अंकाचेही प्रकाशन करण्यात आले. विद्या बाळ यांच्या वतीने ‘मिळून सार्याजणी’ मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

























































