
सामना प्रतिनिधी, पालघर
दोन वर्षांपूर्वी श्रॉफ मैदानाबाबत झालेल्या आंदोलनात भाग घेतला नाही म्हणून सातपाटी गावातील अनिल चौधरी यांच्या कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदारांनी त्यांना कोणतीही वस्तू विकू नये, राममंदिरातदेखील प्रवेश करण्यास बंदी घाला, अगदी स्मशानभूमीतदेखील जागा देऊ नका, असे घृणास्पद मेसेजेस व्हॉटस्ऍपवरून फिरवण्यात येत आहेत. गावातील एका गटाने सुरू केलेल्या या छळाविरोधात चौधरी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्यापि कुणावरही कारवाई केली नाही.
अनिल चौधरी हे पत्नी, मुलगा सनी चौधरी, नात तृषा व सून यांच्यासोबत सातपाटी गावात राहतात. त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय असून स्वतःची बोटही आहे. 2017 मध्ये गावातील श्रॉफ मैदान गावकऱयांना मिळावे यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. मात्र या मैदानाचा वाद न्यायालयात असल्याने अनिल चौधरी यांनी आंदोलनात भाग घेतला नाही. त्याचा राग मनात धरून काही गावकऱ्यांनी चौधरी कुटुंबीयांवर बहिष्कार घातला. त्यांना अक्षरशः वाळीत टाकले असून गावातील कोणत्याही कार्यक्रमात बोलावले जात नाही. सातपाटीमधील मांगेला समाजाचा व्हॉटस्ऍप ग्रुप असून त्यावर चौधरी कुटुंबीयांविरोधात मेसेज टाकले जात आहेत. चौधरी यांच्या बोटीतील मासेदेखील कुणी विकत घेऊ नका असे बजावले असून ते नाइलाजाने मासे विक्रीसाठी रोज अर्नाळा येथे जातात. एवढेच नव्हे तर नात तृषा हिची खासगी शिकवणी बंद केली असून शाळेत कुणी बोलू नका, असा दमदेखील दिला आहे. कोणत्याही कुटुंबाला वाळीत टाकणे हे कायद्याने गुन्हा असून आपणास न्याय द्यावा, अशी मागणी चौधरी यांनी पोलिसांकडे केली आहे.
…तर गुन्हे दाखल करू!
अन्यायाविरोधात अनिल चौधरी यांनी 11 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली. त्यास 15 दिवस उलटले तरीही कारवाई झालेली नाही. चौकशी सुरू असून कुणी दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करू, असे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. दरम्यान सरपंच अरविंद पाटील यांनी चौधरी कुटुंबीयांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून ते फेटाळून लावले.



























































