रिफायनरी प्रकल्प राबविण्याचे कंत्राट पोलिसांना दिले आहे का? विनायक राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयडीसी,राज्य आणि केंद्र सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून दहशत निर्माण करत आहे. राजापूरातील निरपराध ग्रामस्थांना तडीपारच्या नोटीसा बजावल्या आहेत. सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. मुंबई पोलीस फोटो घेऊन चाकरमान्यांच्या घरी जाऊन कारवाई करत आहेत असा आरोप करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प राबविण्याचे कंत्राट पोलिसांना दिले आहे का? असा खणखणीत सवाल आज पत्रकार परिषदेत केला.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, काल तहसीलदारांनी दुपारी अडीच वाजता नोटीसा देऊन ग्रामस्थांना चर्चेसाठी सायंकाळी साडेपाच वाजता बोलावले. ग्रामस्थ चर्चेसाठी गेलेले असताना त्यांना तडीपारच्या नोटीसा बजावल्या गेल्या. प्रत्येक गावातील चार ते पाच निरपराध ग्रामस्थांना नोटीसा बजावल्या आहेत. रिफायनरी विरोधक अमोल बोळे यांच्या घरी काल २०-२५ पोलीस गेले होते. अमोल बोळे घरी नाहीत म्हणून पोलीस बोळेंच्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. पोलीस परिसरात दडपशाही निर्माण करत आहेत. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाबाबत माहिती घ्यायची आहे असे सांगून सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना साडे आठ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात बोलावून बसवून ठेवले आणि अकरा वाजता त्यांना अटक केली आहे, म्हणून सांगितले. मंगेश चव्हाण यांना रक्तदाबाचा त्रास आहे. म्हणून त्यांची पत्नी आणि मुलगी भेटायला आली होती, मात्र त्यांना भेटू दिले नाही. एकप्रकारे पोलीस अन्याय करत असल्याचा आरोप करताना पोलिसांनाही आम्ही न्यायालयात खेचू असा इशारा राऊत यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.

चाकरमान्यांवर दडपशाही
रिफायनरी प्रकल्प विरोधक चाकरमान्यांवर दडपशाही सुरू आहे. मुंबई पोलीस चाकरमान्यांचा फोटो घेऊन परिसरातील लोकांना आपण यांना पाहिलत का? विचारत आहेत. मग त्या चाकरमान्यांच्या घरी जात आहेत. याबाबत विचारणा केली असता आम्हाला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई करायला सांगितले, असे उत्तर मुंबई पोलीस देत असल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला. अतिरेकऱ्याप्रमाणे चाकरमान्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.