
महेंद्र पाटील
एक गोष्ट मनाला जन्मभर सलत होती. कधीही केव्हाही मनाच्या अंतरंगात एका वादळाला जन्म देत होती. मनातले सारे प्रहर व्याकूळ होऊन आतल्या आत धुमसत असताना अतिशय खिन्न अवस्थेतलं मन गर्दीतसुद्धा स्वतला एकटं समजत होतं. त्याला कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. त्याचं मन कशातच रमत नव्हतं. त्याला फक्त एक ठाऊक होतं. कुणाची तरी वाट पाहणं. कुणाच्या तरी आठवणीत व्याकूळ होऊन आठवणीच्या गर्दीत हरवून जाणं. आपल्या आयुष्यातून निसटून गेलेल्या क्षणांची पुन्हा वाट पाहणं. मनाच्या या अवस्थेला जग ‘विरह’ असं म्हणतं.
प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी अशा विरह वणव्यातून जातोच. विरह कधी सुख देतं तर कधी खूप दुःख. साऱ्या प्रश्नांची उत्तरं मनाला विरहातच मिळतात. मग तो विरह कुणाचाही असो. दोन मनांतला विरह मनाला नेहमी त्रासदायक ठरतो. आपल्या ओळखीचे क्षण, आपल्या सवयीच्या गोष्टी जेव्हा अचानकपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा त्या गोष्टीची भासणारी उणीव दुसरं तिसरं काही नसून फक्त विरहच असतो. एखाद्या संध्याकाळी मन काहूरतं. एकेक गोष्ट आठवत राहतं आणि मग मन सैरावैरा धावू लागतं. शोधत राहतं जुन्या आठवणी, जुन्या सावल्या… कारण त्या सावलीत मनाला आधार हवा असतो. कधी कधी अनोळखी चेहरे एखाद्या वळणावर आपल्याला भेटतात आणि चार पावलं आपल्या सोबत चालून एखाद्या वळणावर आपली साथ सोडून जातात. जन्मभर पुन्हा कधीच भेट होणार नाही हे मनाला ठाऊक असतं. अशा वेळी मनात सुरू होतो व्याकूळ करणारा आठवणींचा पाऊस. यावेळी मनाला चाहूल लागते एका विरहाची, जो आपल्याला जन्मभर पुरणारा असतो.
प्रत्येक नात्यातला विरह वेगळा असतो आणि प्रत्येक विरहातल्या भावनासुद्धा वेगळ्या असतात. दोन व्यक्तींच्या दोन मनांच्या भेटीमधलं अंतर म्हणजेच विरह. ते अंतर कधी कमी असतं तर कधी जास्त. पण त्या विरहाची तीव्रता मात्र सारखीच असते. माझ्या मनाला नेहमी असं वाटतं, दोन नात्यांना अधिकाधिक घट्ट करण्यासाठी हा विरहच कामी येतो. कारण याच वेळी आपल्या समोरच्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आपल्याला कळतं. काही विरह जन्माला येतानाच खूप हूरहूर आपल्या सोबत घेऊन येतात, पण आपल्या मनाने ठरवायला हवं, एखादा विरह किती जपावा! विरह वणव्यात होरपळून निघालेली मनं सावरणं खूप कठीण असतं. विरहाचे क्षण जसे जवळ येतात, त्यावेळी आपणच आपल्या मनाला आधार द्यायचा असतो. म्हणजे मनातली हुरहूर थोडी कमी होईल आणि उगीचच त्रास होणार नाही कोणत्याही विरहाचा. हे सगळं बोलायला खूप सोपं जातं. पण मन हे शेवटी मन असतं. त्याला कोण समजावणार? विरहाचे क्षण जवळ आले की, ते हुरहुरतं आणि मनात अनेक हुंदके दाटून येतात आणि जन्माला येते एक कविता…
जाळीत जातो हा विरह वणवा
मला केव्हाचा
गर्द गडद रंग कातरवेळेचा
मी उभा पेटतो ज्वाळांनी
ज्या तुझ्या अंतरीच्या
भोग नशीब हे कसले
तुझ्या माझ्या मनाच्या





























































