
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘भारतमाता की जय’ म्हणणं म्हणजेच फक्त राष्ट्रवाद नाही, तर ‘जय हो’ म्हणणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धर्म, जातीयवाद आणि शहरी-ग्रामीण असा भेदभाव करणे आदी गोष्टींपासून दूर राहा, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. दिल्ली विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भ्रष्टाचार, निरक्षरता, भीती, भूक आणि जातीवादापासून मुक्त असलेल्या नव्या हिंदुस्थानातील युवकांनी लक्ष केंद्रित करायला हवं, असं सांगतानाच नायडू यांनी विद्यार्थ्यांना म्हटले की, राष्ट्रवाद म्हणजे केवळ ‘भारतमाता की जय’ म्हणणे नव्हे, तर ‘जय हो’ म्हणणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. जर धर्म, जाती आणि शहरी-ग्रामीण विभाजनाच्या आधारे लोकांशी भेदभाव करत असाल तर तुम्ही ‘भारतमाता की जय हो’ म्हणू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

























































