श्री विठ्ठल मंदिर पाडव्यापासून दर्शनासाठी खुले, वारकरी संप्रदाय, भाविक, व्यापाऱ्यांमध्ये जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवार दि. 16) रोजी भाविकांना दर्शनाकरीता खूली करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पंढरपूर येथे वारकरी सांप्रदाय व भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर फटाके फोडून स्वागत करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे 17 मार्च पासून बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्य शासनाने अनलॉकमध्ये देखील इतर सेवा सुविधा सुरु केल्या. मात्र गर्दी होणारी ठिकाणे म्हणजेच मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनाकरीता बंदच ठेवली होती. मंदिरे उघडण्यासाठी विविध राजकीय संघटना, वारकरी संघटना यांनी आंदोलने केली. मात्र राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र वारकरी, भाविकांची वाढती मागणी लक्षात घेवून दिवाळीत पाडव्याचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून नियम व अटी लागू करण्यात येणार आहेत. त्याचे पालनही करावे लागणार आहे. मात्र मंदिरे उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे वारकरी सांप्रदाय व भाविकांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर नामदेव पायरी येथे एकत्रित येत फटाके फोडत पेढे वाटून स्वागत करण्यात आले.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मंदिर परिसरात प्रासादिक साहित्य विक्री करणारे व्यावसायीक, दुकानदार, फुलांचे हार, तूळशी हार विक्री करणारे व मंदिरावर उपजीविका अवलंबून असणार्‍या अन्य व्यावसायीकांना व्यावसाय सुरु केल्याने आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे या व्यावसायींकाकडूनही मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात असून शासन कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर जे काही नियम व अटी घालून देणार आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची ग्वाही देण्यात येत आहे.

एकंदरीत गोरगरीबांचा कैवारी, सावळ्या विठ्ठलाचे कोरोनामुळे दर्शन होत नसल्याने चैत्री, माघी व आषाढी यात्रा रद्द झाल्या. अधिक मास महिन्यातही मंदिर बंदच राहिले. त्यामुळे सर्वसामान्य भाविक भक्त दर्शनाकरीता व्याकुळ झाले होते. त्यांनाही आता पाडव्यापासून विठ्ठलाचे दर्शन घेता येणार असल्याने त्यांनाही सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.