
कोरोना संसर्गाचा अक्षरशः स्फोट झाला असून, अवघ्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांत बेड शिल्लक नाहीत, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
गुजरातमध्ये वलसाड येथे अंत्यसंस्काराअभावी मृतदेहांचा खच पडला आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामीळनाडू येथे रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. 24 तासांत तब्बल 2 लाख 73 हजारांवर नवे रुग्ण आढळले, तर 1619 जणांचा मृत्यू झाला. रोज तीन लाखांवर नव्या रुग्णसंख्येकडे देशाची चिंताजनक वाटचाल सुरू आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राजधानी दिल्लीत सहा दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आकडेवारी धडकी भरवणारी आहे. महाराष्ट्रातच नाही तर सर्वच राज्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.
दिल्लीत 26 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
देशाच्या राजधानी दिल्लीत रविवारी एका दिवसांत 25 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि 161 जणांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचीही प्रचंड टंचाई आहे.
या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 26 एप्रिल सकाळी 5 पर्यंत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. किराणा दुकाने, मेडिकल, हॉस्पिटल्स या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. खासगी कार्यालये बंद राहतील. मेट्रो आणि बस 50 टक्के क्षमतेने चालणार आहेत.
गुजरातमधील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली असून, मुख्यमंत्री विजय रुपाणी सरकार रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी लपवत आहे. विशेषतः अहमदाबाद, सुरत, भरूच, राजकोट, वलसाडमध्ये भयंकर स्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी सुरतमध्ये एकाच चित्तेवर पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. 24 तासांत राज्यांत 10 हजार 340 वर नवे रुग्ण आढळले असून, 110 जणांचा मृत्यू झाला आहे.
15 दिवसात 25 लाख रुग्ण वाढले
कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे. देशाच्या कानाकोपऱयात हा संसर्ग सुरू आहे. 19 डिसेंबर 2020ला देशात एक कोटी लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर रुग्णसंख्या 1 कोटी 25 लाख होण्यासाठी तब्बल 107 दिवसांचा कालावधी लागला. 5 एप्रिल 2021ला देशात एकूण रुग्णसंख्या 1.25 कोटी झाली होती. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांत 25 लाखांनी रुग्णसंख्या वाढली. आतापर्यंत देशात 1 कोटी 50 लाख जणांना संसर्ग झाला आहे. आता रोज तीन लाख रुग्णसंख्येच्या दिशेने भयंकर वाटचाल सुरू आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तसेच मृत्यूदर 1.19 टक्के आहे.
हॉस्पिटलने कार जप्त करून मृतदेह ताब्यात दिला
वलसाडमध्ये एका कोरोना संशयित महिलेचा 12 एप्रिलला मृत्यू झाला. रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी 40 हजार रुपये अॅडव्हान्स भरला होता. मात्र, उपचाराचे बील 2 लाख आले. हे पैसे भरा तरच मृतदेह ताब्यात देऊ, अशी आडमुठी भूमिका रुग्णालयाने घेतली. अखेर संजय हलपती या नातेवाईकाने आपली कार रुग्णालयाला दिली आणि त्यानंतरच महिलेचा मृतदेह मिळाला. दरम्यान, कोरोना संशयित रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कसा दिला आणि कार जप्त करून का घेतली? याची चौकशी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
काय आहे स्थिती?
देशात 24 तासांच 2 लाख 73 हजार 810 नवे कोरोनाबाधित आढळले. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. एका दिवसांत 1619 जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात 68631 नवे रुग्ण आढळले, 503 जणांचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशात 30596 नवे रुग्ण, 129 जणांचा मृत्यू. मध्यप्रदेशात 12428 रुग्ण, 66 जणांचा मृत्यू झाला.
गुजरातमध्ये रुग्णसंख्या वाढली आणि मृताचा दर फार भिषण आहे. 10340 नवे रुग्ण आढळले त्यात 110 जणांचा मृत्यू झाला.
पुंभमेळा सुरू असलेल्या उत्तराखंडमीधील हरिद्वार, डेहराडून येथे संसर्ग वाढला आहे. 3 हजारांवर नवे रुग्ण आढळले. 37 जणांचा 24 तासांत मृत्यू झाला.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील प्रचार सभांमुळे या राज्यांत कोरोनाचा स्पह्ट झाल्याचे स्पष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 8419 नवे रुग्ण आढळले. आजवरची येथील ही सर्वाधिक संख्या असून, एका दिवसांत 28 जणांचा मृत्यू झाला. तामिळनाडूत 10723 नवे रुग्ण आढळले. 42 जणांनी प्राण सोडले. केरळमध्ये 18257 जणांना संसर्ग झाला. 25 जणांचा मृत्यू झाला.
गुजरातेत मृतदेहांचा खच
गुजरातमध्ये एवढी भयंकर स्थिती आहे की वलसाड सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडला आहे. मृतदेहांना दुर्गंधी सुटली आहे. नातेवाईकांना मृतदेहाचे दुरून दर्शनही घेता येत नाही. रुग्णालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या असून, संतापाची लाट उसळली आहे.
लखनौ, वाराणसीसह प्रमुख शहरांत लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतः पाऊल उचलत लखनौ, वाराणसी, प्रयागराज आणि कानपूर या प्रमुख शहरांत 26 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यास नकार दिला आहे.
उत्तरप्रदेशात 24 तासांत 30 हजार नवीन रुग्ण आढळले असून, 129 जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि कानपूरमध्ये हाहाकार माजला आहे.
राजस्थानातील स्थिती अत्यंत धोकादायक – मुख्यमंत्री
राजस्थानमधील स्थिती अत्यंत धोकादायक असून, नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे अवाहान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. रविवारी 10 हजारांवर नवे रुग्ण आढळले. 42 जणांचा मृत्यू झाला.
अयोध्येत रामनवमी उत्सव भाविकांविना
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आयोध्येत रामनवमी उत्सव भाविकांविना होणार आहे. बुधवारी निवडक पुजारी, साधू-संतांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव होईल. भाविकांना प्रवेशबंदी असेल.




























































