
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘जय जय, जय जय, जय श्रीराम’, ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ आणि ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबई विमानतळावर आज जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, डौलाने फडकणाऱया भगव्या झेंडय़ांमुळे संपूर्ण विमानतळ परिसरात एकच जल्लोष निर्माण झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर दुपारी 4 वाजता मुंबई विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील होते. ‘अयोध्ये’च्या यशस्वी दौऱयावरून परतलेल्या आपल्या लाडक्या नेत्याचे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले. यावेळी ढोलताशांच्या गजरात ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणाही देण्यात आल्या. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. अनेक महिलांनी यावेळी फेर धरून फुगडीही घातली. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, आमदार मंगेश कुडाळकर, विभाग क्र. 6 च्या संघटिका संजना मुणगेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.
धावपट्टीवर अचानक आली नीलगाय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौरा आटोपून फैजाबाद विमानतळावरून दुपारी विशेष विमानाने निघाले, मात्र विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर अचानक नीलगाय आली. मात्र कोणत्याही अडथळय़ाशिवाय विमानाने यशस्वी उड्डाण केले. ही दृश्ये उपस्थित मीडियाच्या कॅमेऱयात कैद झाली. यावेळी विमानाने यशस्वी उड्डाण केले असले तरी धावपट्टीवर अचानक नीलगाय आलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणार आहे.

























































