चेंबूर, वडाळा, परळ, कुर्ला, भायखळय़ातील पाणीपुरवठा सुधारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळातही मुंबईकरांना मूलभूत सुविधा अखंड पुरवणाऱया मुंबई महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. अमर महाल ते ट्रॉम्बे आणि अमर महाल ते परळ जलबोगद्याचे काम वेगाने होत असून त्यामुळे चेंबूर, वडाळा, कुर्ला, परळ, भायखळा या परिसरातील पाणीपुरवठय़ात आणखी चांगली सुधारणा होणार आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम वेगात सुरू असून 600 मीटरहून जास्त खोदकाम झाले असून
2024 आणि 2026 मध्ये या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण होणार आहे.

मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सेवा अत्यंत माफक दरात देणारी मुंबई महापालिका विविध सेवांमध्ये टप्प्याटप्यात सुधारणा करत असते. मुंबईकरांना अत्यंत स्वच्छ, सुरक्षित पाणी देण्यासाठी वचनबद्ध असून मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेचे पाणी खाते सातत्याने प्रयत्न करत असते. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठा खात्यामार्फत हे दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.

  • अमर महाल ते परळ सुमारे 9.68 किलोमीटर लांबीच्या भूमिगत जलबोगद्यामुळे एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारणार आहे.
  • अमर महाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे 5.52 किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व व एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारणार आहे.
  • हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे 100 ते 110 मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास 3.2 मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या या मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत.

कोरोनाची ‘नाका’बंदी

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. त्यामुळे संसर्गाचे टेन्शन कमी झाले असले तरी महापालिका प्रशासन खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करीत आहे. शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर इतर राज्यांतून येणाऱया एक्प्रेसमधील प्रवाशांची मुंबईत उतरताच अॅण्टीजन टेस्ट केली जात आहे. दादर स्थानकात प्रवाशांची चाचणी करताना महापालिकेच्या आरोग्य पथकातील कर्मचारी.