INDIA meeting – आज आणि उद्या मुंबईत इंडियाची बैठक; अवघ्या देशाचे लक्ष

‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक उद्या गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस मुंबईत होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज हॉटेल ग्रँड हयात येथे भरगच्च पत्रकार परिषदेत या बैठकीबाबत माहिती दिली. ‘आमच्याकडे पंतप्रधान बनण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भाजपकडे मोदी सोडून काय पर्याय आहे?’ असा खडा सवाल इंडियाच्या नेत्यांनी केला. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आणि जुमलेबाजीच्या जोखडापासून भारतमातेचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशभक्त पक्ष एकवटले आहेत. देशभरातील 28 पक्ष एकत्र आले आहेत असे सांगताना आमची इंडिया आघाडी भक्कमपणे वाटचाल करत आहे आणि येत्या निवडणुकीत देशात निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे, असा ठाम विश्वास या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

कसलाही संभ्रम नाही – शरद पवार

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्यापि सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेनुसार निर्णय झाला तर काही लोकांवर जबाबदारी द्यावी लागेल. अन्य पक्षांशी संवाद साधून एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भात अभ्यास करावा लागेल.

राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतरही अजित पवार-शरद पवार यांची गुप्त बैठक झाली. तो मुद्दा प्रसारमाध्यमांनी आज उपस्थित केला. शरद पवार इंडिया आघाडीत आणि त्यांचे सहकारी भाजपात यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही संभ्रम निर्माण होत आहे, असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर शरद पवार यांनीच कोणताही संभ्रम नसल्याचे स्पष्ट केले. बंडखोरांना राज्यातील मतदारच त्यांची जागा दाखवतील, असेही ते म्हणाले.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह लोकसभेच्याही निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियाच्या मुंबई मीटमध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा होणार का, असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही, असे नमूद करत पवार यांनी मतप्रदर्शन केले.

मायावती, बीआरएस, एमआयएमला आघाडीत घेण्याचा निर्णय सर्वानुमते

बसपाच्या मायावती यांनी इंडिया आघाडीत सहभागी न होता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता शरद पवार म्हणाले की, मायावतींनी भाजपबरोबर सुसंवाद ठेवला असून त्या नक्की कोणाबरोबर जाणार हे स्पष्ट झाल्यानंतरच यावर पुढे बोलता येईल. बीआरएस आणि एमआयएम या दोन पक्षांना आघाडीत घेणार का असेही यावेळी पत्रकारांनी विचारले त्यावर, या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांशी अद्याप बोलणे झाले नसून त्यांना आघाडीत घ्यायचे की नाही हा निर्णयही एकत्रित बसून घ्यावा लागणार आहे, असे उत्तर पवार यांनी दिले. मुस्लिम पक्ष ECf चीही आघाडीत येण्याची तयारी आहे, परंतु त्यासंदर्भातील निर्णय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी चर्चा करून एकत्रितपणे घ्यावा लागेल, असेही पवार यांनी सांगितले. अकाली दलाला सोबत घेण्याचा निर्णयही दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सर्वानुमते घ्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

इंडिया परिवर्तन घडवेल

देशातील जनतेला आता परिवर्तन हवे असून अनेक राज्यांमधून इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. विविध 28 राजकीय पक्ष आणि त्यांचे 63 प्रतिनिधी इंडिया बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकांमधून एक पर्यायी व्यासपीठ तयार होऊन देशात आवश्यक असलेल्या परिवर्तनासाठी मजबुतीने उभा राहील, हेच आम्ही करणार आहोत, असे शरद पवार यांनी पुढे सांगितले.

पवारांचे मोदींना आव्हान

घोटाळय़ाचे आरोप करता तर चौकशी करा, असे थेट आव्हान यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदींना दिले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेसवर भ्रष्टाचाराची टीका केली. राष्ट्रवादीवर टीका करताना राज्य सहकारी आणि जलसंपदा घोटाळा या दोन गोष्टी त्यांनी कटाक्षाने सांगितल्या. सत्तेचा गैरवापर झाल्याची माहिती असेल तर त्यांनी त्याची चौकशी करावी. केवळ आरोप करून उपयोग नाही तर वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, असे पवार म्हणाले.

इंडियात भरती सुरूच;  ताकद वाढतेय – नाना

बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत ‘इंडिया’चे 26 घटक पक्ष होते. महाराष्ट्रात आल्यावर ही संख्या 28 वर पोहोचली आहे. ‘इंडिया’ वाढत आहे आणि हीच वाढ कायम राहून चीन मागे हटेल, असा विश्वास  नाना पटोले यांनी व्यक्त केला.

हुकूमशाही प्रवृत्तीला रोखण्यासाठी एकत्र – चव्हाण

कोणा एकाला विरोध करण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी देशातील 28 पक्ष एकत्र आलेत. वाढत्या हुकूमशाहीला विरोध करण्यासाठी आपण एका छताखाली आल्याची आनंदाची बाब आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.

इंडिया पुढे जाईल तशी चीनची पीछेहाट होईल – संजय राऊत

मुंबईचे वातावरण आता इंडियामय झाले आहे. आघाडीच्या बैठकीची पूर्ण तयारी आम्ही केली आहे. लडाख, अरुणाचल करत चीन हिंदुस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करतोय, पण इंडिया जसजसा पुढे वाढत जाईल तसा चीनही मागे हटेल, ही इंडियाची ताकद आहे, असा ठाम विश्वास यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक इंडिया बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. पहिल्या दोन बैठकीतच केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस 200 रुपयांनी कमी केला ही इंडियाची ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लालूप्रसाद यादव या बैठकीसाठी येत असताना त्यांना पत्रकारांनी विचारले त्यावर, मोदीजींच्या नरडीवर पाय ठेवायला जातोय असे ते म्हणाले. याचा अर्थ आम्ही हुकूमशाहीच्या विरुद्ध लढायला जातोय असा आहे, असे संजय राऊत म्हणाले. लालूप्रसाद, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या बैठकीसाठी मुंबईत पोहोचल्या आहेत. उद्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, जनता दलाचे नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमेंत सोरेन येणार आहेत, अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली.

आज

  • सायंकाळी 6 ते 6.30 दरम्यान प्रमुख पाहुणे आणि प्रतिनिधींचे  स्वागत
  • सायंकाळी 6.30 वाजता अनौपचारिक बैठक
  • रात्री 8 वाजता स्नेहभोजन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आयोजन

उद्या

  • सकाळी 10.15 वाजता  फोटोसेशन
  • सकाळी 10.30 वाजता ‘इंडिया लोगो’चे प्रकाशन, इंडिया कॉन्फरन्स
  • दुपारी 2 वाजता  प्रतिनिधी-पाहुण्यांचे स्नेहभोजन
  • दुपारी 3.30 वाजता  ‘इंडिया’ची पत्रकार परिषद