
>> स्पायडरमॅन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हिंसा थांबणार? : आज जगात अनेक कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. वाहतुकीच्या सिग्नलपासून ते हवामानाच्या अंदाजापर्यंत आणि एखाद्या वैद्यकीय चिकित्सेपासून ते विविध खाद्यपदार्थ बनवेपर्यंत अनेक क्षेत्रांत सध्या आयईची मदत मिळत आहे आणि कामही वेगाने आणि सफाईने पार पडत आहे. आता याच आयईच्या असामान्य कार्यकुशलतेच्या मदतीने दोन देशांच्या सीमांवर अचानक उसळणारे युद्ध किंवा एखाद्या देशात अचानक उफाळणारा हिंसाचार याचा आधीच अंदाज बांधणे शक्य आहे का या पर्यायावर शास्त्रज्ञांची एक टीम सध्या काम करत आहे. सध्या जगात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर आकडेवारी उपलब्ध आहे. या विविध आकडेवारीचा उपयोग या प्रयोगात करण्यात येत आहे. येणाऱया काळात हिंसाचार उफाळू शकतो अशा विविध देशांमधील सीमांचा डेटाबेस ही शास्त्रज्ञांची टीम तयार करत आहे. खुद्द संयुक्त राष्ट्रे, रेड क्रॉस, वर्ल्ड बँकसुद्धा अशा परिस्थितीच्या अंदाजासाठी सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्सची मदत घेत आहेत. बांगलादेशची सीमा किंवा तिथल्या रोहिंग्यांचा प्रश्न असो किंवा सध्या हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव असो, अशा वेळी सीमेवरील वातावरण हे कायमच तंग असते. अशा वेळी आयईला योग्य पद्धतीने विविध अंगांशी निगडित योग्य त्या प्रमाणात आकडेवारी पुरवली गेली तर त्याच्या मदतीने अचानक उसळणाऱया हिंसाचाराचे पूर्वानुमान लावणे अधिक सहज आणि सोपे होणार आहे. मानवी बुद्धिमत्ता ही बरेच पूर्वग्रहाची शिकार असते किंवा द्विधा मनःस्थितीत निर्णय करत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मात्र असा कोणताच प्रकार घडत नसल्याने बांधले जाणारे अंदाज हे अधिक अचूक असतात. विकसनशील आणि विकसित देशदेखील या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून येणाऱया नैसर्गिक संकटांचा- जसे की दुष्काळ, पूर इत्यादींचा- अंदाज लावू शकणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत एखाद्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे देखील शक्य होणार आहे.






























































