कशी केलीस माझी दैना, तुझ्याबिगर करमेना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना… लाही लाही होते माझ्या अंगाची अशा एकामागोमाग अनवट थाटाच्या लावण्या मध्यरात्री सादर झाल्या आणि लावण्यवतींच्या अदाकारीने कालिदास नाटय़गृह दणाणून गेले. बिजलीच्या चपळाईचे नृत्य, कडाडलेली ढोलकी आणि वन्समोअर देणारी अभूतपूर्व गर्दी यामुळे नाटय़ संमेलन लावणीमय होऊन गेले. रसिकांच्या शिट्टय़ा, टाळय़ा आणि लावणीच्या रंगात मध्यरात्र हरवून गेली.नाटय़ संमेलनात झालेली लावण्यांची ‘संगीतबारी’ खऱया अर्थाने यादगार ठरली. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शकुंतलाबाई नगरकर, आकांक्षा कदम व पुष्पा सातारकर यांनी आपल्या लावणीगायन व नृत्यातून महाराष्ट्राच्या वैभवशाली लोकपरंपरेचे अनोखे दर्शन घडवले. कालिदास नाटय़गृह लावणीप्रेमींनी ओसंडून वाहत होते. भव्य स्टेज, आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि घुंगरांचा लावण्यनाद उपस्थितांच्या काळजाला सुगंधी जखम करून गेला.

संमेलनाध्यक्षांनी केला गौरव
संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी लावण्यवतींचा खास गौरव केला. मी स्वतः लावणीकडून खूप काही शिकले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तुम्हीच शाहीर, सोंगाड्या, नायिका आणि सबकुछ अशा शब्दांत शकुंतलाबाई नगरकर यांचा शिलेदार यांनी सन्मान केला.

अहो या नाss!
अहो या ना, जरा घ्या ना, आंबा तोतापुरी… या अस्सल पारंपरिक लावणीने सारे नाटय़गृह डोक्यावर घेतले. आकांक्षा कदम यांच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले. नेसले पीतांबर जरी, नका धरू हात बांगडी फुटल बाई अशा अनेक लावण्यांचा खजिना उलगडत गेला. पुष्पा सातारकर यांनी दिल चीज क्या है या गाण्यावर सादर केलेली अदाकारी लाजवाब ठरली. आकर मेरे कब्र पर तुमने जो मुस्कुरा दिया या कव्वालीने अवघे नाटय़गृह नादमय झाले. विनायक जावळे यांचा ढोलकीचा तोडा कडाडून गेला तेव्हा टाळय़ाही कडाडल्या.