
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना खूशखबर आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने गुरुवारपासून 15 डब्यांच्या आणखी 12 लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 144 होणार आहे. या वाढीव डब्यांमुळे बारा डब्यांच्या लोकलच्या तुलनेत 25 टक्क्यांनी प्रवाशी वाहतूक क्षमता वाढणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज 1387 उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातात. त्यामध्ये सर्वाधिक बारा डब्यांच्या लोकल असून 132 पंधरा डब्यांच्या तर 79 एसी लोकल आहेत. तरीही लोकलमध्ये प्रवाशांची मोठी रेटारेटी होते. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने बारा डब्यांच्या बारा लोकल पंधरा डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारपासून चालवण्यात येणाऱया पंधरा डब्यांच्या 12 गाडय़ांपैकी सहा गाडय़ा धिम्या मार्गावर, तर सहा जलद मार्गावर धावणार आहेत. या गाडय़ा दादर, बोरिवली, अंधेरी येथून वसई, विरार, नालासोपारासाठी सुटणार आहेत.
मुंबई मॅरेथॉननिमित्त विशेष लोकल
मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धक सहभागी होतात. त्यांना वेळेत चर्चगेटला पोहचता यावे म्हणून पश्चिम रेल्वे 15 जानेवारी रोजी विरार-चर्चगेट आणि वांद्रे-चर्चगेट अशा दोन विशेष लोकल चालवणार आहे. पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी बोरिवलीहून चर्चगेटसाठी सुटणारी लोकल 3 वाजून 45 मिनिटांनी सोडली जाईल.
























































