स्मार्टवॉच बोलू लागले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> सुहास मळेकर

त्या दिवशी एक तरुण ट्रेनमध्ये चढला. त्याचे साधारण पंधरा ते वीस हजारांचे स्मार्टवॉच ट्रेनमधील गर्दीत कुठेतरी हरवले होते. त्यानंतर कुणाला विचारायची सोय नव्हती. कारण तो ट्रेनमधून मुक्कामी उतरला. घरी गेल्यावर कळले मनगटावर घडय़ाळ नाही. त्याने विचार केला, दुसऱया दिवशी सकाळी ऑफिसला जाताना त्याच डब्यात चढून बघावं. नशिबात असेल तर मिळेल, नाहीतर गंगार्पण.

दुसऱया दिवशी सकाळी त्याने त्याच डब्यात चढून इकडे तिकडे घडय़ाळाचा शोध घेतला. ‘‘कुणाला माझे स्मार्टवॉच सापडलेय का?’’ टाचा वर करून करून तो कोण रिप्लाय देतोय का, याचा अंदाज घेत होता. त्याने पुन्हा मोबाईलच्याच साहाय्याने त्या स्मार्टवॉचला साद घातली आणि तिकडून स्मार्टवॉचचा अलर्ट वाजू लागला.

इतर प्रवाशांनी कानोसा घेतला आणि ज्याच्या बॅगेतून स्मार्टवॉचचा आवाज येत होता त्या प्रवाशाला हलवले. त्याला म्हणे ऐकू गेले नव्हते, तोसुद्धा कालपासून घडय़ाळाचा मालक शोधत होता.

त्याने मऊसूत कपडय़ात गुंडाळून ठेवलेला तो किमती ऐवज मालकापर्यंत पोहोचविला. तो उघडून बघेपर्यंत एक जण मोठय़ाने ओरडला, ‘‘आता पार्टी!’’ आनंदलेला तो तरुण ‘‘पार्टी कशी द्यावी’’ म्हणून विचारात पडला.

त्याला एकाने म्हटले, ‘‘कुणाला पार्टी नका देऊ, पण जमलं तर एखाद्या भुकेलेल्याला खायला द्या!’’

‘‘नक्कीच!’’ असे म्हणत स्मार्टवॉच मनगटावर बांधत तो आनंदाने ट्रेनमधून उतरून निघून गेला…

एकंदरीत काय तर नवीन तंत्रज्ञानाने आता या वस्तूसुद्धा बोलू लागल्यात. मनसोक्त फिरून पुन्हा मालकाला येऊन बिलगू लागल्या आहेत.