बिग बॉस मराठीचा पहिला सिझन कोण जिंकणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्वेता पवार-सोनावणे । मुंबई

बिग बॉस मराठीचा पहिला सिझन आता अंतिम आठवड्यात येऊन पोहोचला आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. घरातील सहा फायनलिस्ट आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, मेघा धाडे, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत हे सर्वच जण संपूर्ण ताकदीनिशी खेळत असून प्रत्येकजण जिंकण्यासाठी एकमेकांना टफ फाईट देत आहे. प्रेक्षकांमध्ये विजेतेपदासाठी पुष्कर, स्मिता आणि मेघाचे नाव आघाडीवर असले तरी या स्पर्धकांमधून कोण जिंकेल हे प्रेक्षकांची मते ठरवणार आहेत. मात्र या स्पर्धकांसोबत घरात राहिलेल्या माजी स्पर्धकांना कोण आवडतं, त्यांना काय वाटतं कोण जिंकेल हे आपण आज जाणून घेतले आहे.

सुशांत शेलार –

sushant-shelar

अभिनेता सुशांत शेलार हा सुरूवातीपासूनच फायनलचा एक तगडा दावेदार मानला जात होता. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे सुशांतला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. या स्पर्धेत सुशांतचा खास मित्र आस्ताद जरी फायनलमध्ये असला तरी त्याला स्मिता गोंदकर जिंकावी असे मनापासून वाटत आहे. त्याला स्मिता जिंकेल अशी खात्री देखील वाटतेय. ‘स्मिता अतिशय प्रामाणिकपणे खेळली आहे. तिच्याविरोधात पुष्कर, मेघा, सईने कायम वाईटच बोलले आहेत मात्र ती कधीट कुणाविषयी वाईट बोलली नाही. टास्कमध्ये तिने स्वत:ला झोकून दिले होते. त्यामुळे तीच जिंकली पाहिजे, असे सुशांत सांगतो.

जुई गडकरी –

jui-gadkari-1

घरात कायम शांत राहणाऱ्या जुईची विजेता म्हणून पसंती देखील स्मितालाच आहे. स्मिता आणि जुई घरात चांगल्या मैत्रिणी होत्या. ‘स्मिताने आतापर्यंत कधीच चिंटींग केलेली नाही. तिचा प्रामाणिकपणा जसा आम्हाला आवडायचा तसा प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडला असणार, त्यामुळे तिची जिंकण्याची शक्यता मला जास्त वाटते.’ असे जुई सांगते.

अनिल थत्ते –

anil-thatte-big-boss

पत्रकार अनिल थत्ते अवघे तीन आठवडेच बिग बॉसच्या घरात राहिले. मात्र बिग बॉसमधला त्यांचा वावर हा लक्षात राहण्यासारखा आहे. थत्ते यांचे पुष्कर सोबत घरात चांगले संबंध होते आणि त्यांना पुष्करच जिंकेल असा त्यांना ठाम विश्वास आहे. ‘पुष्कर खूप चांगल्या प्रकारे घरात राहिलाय. त्याने कुणाशीच दुश्मनी केली नाही. कुणाबद्दल वाईट बोलला नाही. त्यामुळे तो कायम लोकांच्या गुडबुकमध्ये राहिलाय. त्यामुळे तो जिंकेल याची मला खात्री आहे, असा विश्वास थत्ते यांनी व्यक्त केलाय

रेशम टिपणीस –

rsham-tipnis-1

शेवटच्या पाचांमध्ये तरी आपण नक्की असू अशी खात्री असलेल्या रेशमला गेल्या आठवड्यात झालेल्या एविक्शननें जबरदस्त धक्का दिला. त्यामुळे प्रेक्षकांच्या मतांची कांडी कुणावर फिरेल हे सांगता येणं कठिण असल्याचे ती सांगते. मात्र तरिदेखील तिला स्मिता जिंकेल असा विश्वास वाटतोय. लोकांना जसा मसाला, भांडण तंटे बघायला आवडते तसेच शांत व चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींवरही ते प्रेम करतात. त्यामुळे मेघा सईने कितीही मसाला दिला तरी स्मिताचा साधेपणा नक्की लोकांना भावेल, अशी खात्री रेशमला वाटतेय.

हर्षदा खानविलकर –

harshada-khanvilkar1

हर्षदा ही घरात पाहुणी म्हणून आली होती. रेशमच ही स्पर्धा जिंकावी अशी तिची फार इच्छा होती. मात्र रेशम नुकतीच घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता स्मिता ही हर्षदाची आवडती स्पर्धक ठरली आहे. ती जिंकू देखील शकते असा विश्वास हर्षदाला वाटतो. ‘स्मिता आणि पुष्कर हे सध्या दोन तगडे स्पर्धक असून त्यांच्यापैकीच एक जण जिंकेल, अशी खात्री हर्षदाला वाटतेय.

उषा नाडकर्णी –

usha-nadkarni

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचे घरात सई, पुष्कर, मेघा आणि शर्मिष्ठासोबत चांगले संबंध होते. मात्र आता त्यांना स्मिता ही विजेतपदाची प्रबळ दावेदार वाटत आहे. स्मिता किंवा मेघा जिंकू शकते. स्मिता कुणाबद्दल कधीच वाईट बोलली नाही त्यामुळे लोकांना ती आवडतेय. तर मेघा ही चांगली खेळत होती त्यामुळे तिचे देखील बरेच फॅन्स आहेत, असे उषा नाडकर्णी सांगतात.

राजेश शृंगारपुरे –

rajesh-shringapure-1

राजेश शृ़ंगारपुरे आणि रेशम टिपणीसचे घरातील संबंध फार गाजले होते. मात्र राजेश पाहुणा म्हणून जेव्हा घरात आलेला त्यावेळी त्याने मेघा ही तगडी दावेदार असल्याचे म्हटले होते. मात्र आता राजेशला स्मिताच बाजी मारेल याची खात्री आहे. ‘मेघा ही खूप चांगली खेळत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचा खेळ बिघडलाय. तिच्याविषयीचं प्रेक्षकांचं मत बदलतं. तर स्मिताने तिच्या चांगुलपणाने सर्वांची मने जिंकलीयत, त्यामुळे ती जिंकेल, असे राजेशला वाटते.

नंदकिशोर चौघुले –

nandkishor

घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल नंदकिशोर चौघुले यांना मेघा जिंकेल असे वाटते. मेघाने शोचा पूर्ण अभ्यास केला आहे, या शो साठी ती परफेक्ट आहे. चांगले कपडे घालणे, सकाळी नाचणं, सगळ्यांशी भांडणं हे जे काही त्या शो मध्ये अपेक्षित आहे ते ती करतेय त्यामुळे ती जिंकेल असं नंदकिशोर यांना वाटतं.