मोदी-शाह जोडीला पुन्हा गुजरातमध्ये पाठवू, ममता, केजरीवाल यांचा इशारा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । विशाखापट्टणम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घटनात्मक वैधानिक संस्थांचे अस्तित्वच धोक्यात आणले असल्याचा आरोप करीत तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी -शाह जोडीला लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा गुजरातमध्ये पाठवू असा इशारा विशाखापट्टणम येथील प्रचार रॅलीत बोलताना दिला. हे दोन्ही नेते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा  चंद्राबाबू नायडू यांनी टीडीपीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीत बोलत होते. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षालाच पुन्हा आंध्र प्रदेशाची सत्ता मिळावी असे आवाहनही या उभय नेत्यांनी केले.

तिसऱ्या आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मानल्या जाणाऱ्या विशाखापट्टणमच्या आजच्या रॅलीत ममता बॅनर्जींचा तृणमूल, केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम या पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ममता आणि केजरीवाल यांनी देशवासीयांचा मोठा पाठिंबा मिळत असलेल्या भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करताना मोदी आणि शाह यांना लक्ष्य केले. भाजपच्या सहकारी संघटनांनीही मोदी-शाह जोडीला या लोकसभा निवडणुकीत मदत करू नये असे आवाहन करायला ममता विसरल्या नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नाही -ममता 

पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही असे भाकीत करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की,२०१४ सारखे यश मिळवण्याचे स्वप्न भाजपने यंदा पाहू नये. भाजपला या लोकसभा निवडणुकीत ५४३ लोकसभा जागांपैकी फारतर १२५ जागा मिळतील असे भविष्यही ममता यांनी वर्तवले.

मोदी कुणाचेच ऐकत नाहीत- केजरीवाल 

पंतप्रधान मोदी कुणाचेच ऐकत नाहीत अशी खंत व्यक्त करताना आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या हतबलतेचे प्रदर्शन आंध्रातील मतदारांपुढे केले. मोदी आणि शाह यांनी धार्मिक भेदभावाचे राजकारण करीत देशाच्या जनतेत फूट पाडण्याचे काम केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. आमची आघाडी सत्तेत आल्यास आम्ही दिल्ली आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासनही त्यांनी शेवटी केले.