
पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात दोन दिवस मांस-मासे विक्रीवर महापालिकेने बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन बंदीचे पत्रक तातडीने मागे घेण्याची मागणी केली. कुणी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी मांस-मासे विक्री बंद करावी, हा तुघलकी निर्णय आहे. महापालिकेने जारी केलेले पत्रक तातडीने मागे घ्यावे, असे निवेदन मराठी एकीकरण समितीने अतिरिक्त आयुक्तांना दिले.
एखाद्या धर्माच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आणि त्या आधारे इतर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर निर्बंध लादणे यात फरक आहे. मांस-मासे विक्री बंदीचा थेट परिणाम आगरी-कोळी समाजातील मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार आहे. महापालिका ठरावाच्या अधिकारावरही समितीने प्रश्न उपस्थित केला. ‘पालिका ठराव करते म्हणजे तो नागरिकांवर लादण्याचा अधिकार मिळतो का, उद्या बहुमताच्या जोरावर शहराचे नाव बदलण्याचा ठराव केला तर तो नागरिकांनी स्वीकारायचा का,’ असा सवाल यावेळी मराठी समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी केला.
तुम्ही इंग्रज नाही लोकसेवक आहात
तुम्ही इंग्रज नाही, लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवावे. शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका आणि समाजात तेढ निर्माण होईल असे निर्णय घेऊ नका, असे आवाहन मराठी एकीकरण समितीने पालिका प्रशासनाला यावेळी केले.



























































