अंधेरीत महिलेची डोक्यात दगडाने ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरीच्या गिल्बर्ट हिल जवळ आज 25 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. डी.एन. नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. तपासदरम्यान चार जणांना चौकशीकरिता पोलिसांनी ताब्यात घेतले.

गिल्बर्ट हिलच्या जवळ महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी डी. एन. नगर पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कूपर रुग्णालयात पाठवला. महिलेच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत महिला ही अंधेरी परिसरात राहते. तपासाकरिता एक पथक तयार करण्यात आले. पोलीस त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. चौकशीनंतर काही बाबीचा उलगडा होणार आहे.