गॅस पेटवताना आगीचा भडका उडाला, महिलेचा जळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन, नांदेड

गॅस पेटवत असताना आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण घर पेटलं आणि गॅस पेटवणारी महिला होरपळून मृत्युमुखी पडली. देगलूर तालुक्यातील होट्टल येथील ही घटना आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास सोनाली रामदास लंकावाड ( वय 21) या स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवत होत्या.यावेळी अचानक भडका उडाला आणि काही सेकंदातच संपूर्ण घराने पेट घेतला. भडका उडाल्याने सोनाली या देखील होरपळल्या होत्या. घरानेही पेट घेतल्याने सोनाली यांना घराबाहेर पडताच आलं नाही.

लंकावाड यांच्या घराला आग लागल्याचं कळताच ग्रामस्थांनी या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी हाताला जे भांडे मिळेल त्याने पाणी मारायला सुरुवात केली. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. आग विझेपर्यंत सोनाली यांचा मृत्यू झाला होता. घरात शिरल्यानंतर ग्रामस्थांना सोनाली यांच्या देहाचा फक्त सांगाडा दिसून आला. सोनाली यांचं लग्न 2 वर्षांपूर्वी रामदास यांच्याशी झाले होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या घरी एकट्याच होत्या.