भूक भागवायला आली, पण नराधमांनी तिलाच ‘शिकार’ बनवली; दलित महिलेला बंदी बनवून 22 दिवस बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे भूक भागवण्यासाठी आलेल्या एका दलित महिलेला ढाबा मालकाने आधी बंदी बनवले आणि नंतर कामगारांच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार तब्बल 22 दिवस सुरू होता.

ढाबा मालक, कुक आणि एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केले असून या नराधमांच्या तावडीतून सुटून महिलेने घर गाठले आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या पतीने नादन देहात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पीडिता सतना जिल्ह्यातील मेहर तालुक्यातील रहिवासी आहे. 20 नोव्हेंबर रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर महिला दुपारी 12 वाजता रागाने घर सोडून पायी आपल्या नातेवाईकांकडे निघाली होती. वाटेत भूक शमवण्यासाठी ती कंचना नावाच्या एका ढाब्यावर थांबली. एकटी महिला पाहून ढाबा चालकाच्या अंगातील राक्षस जागृत झाला आणि त्याने महिलेला जेवणाचे आमिष दाखवत कामगारांच्या मदतीने तिला बंदी बनवले व तिच्यावर बलात्कार केला.

ढाब्यावर जेवण केल्यानंतर रात्र झाल्याचे म्हणत तिन्ही आरोपींनी पीडितेला ढाब्यावरच रात्री मुक्काम करण्यास सांगितले. सतत चालल्याने पीडिता थकली होती. चांगले लोक समजून तिनेही ढाबा मालकाचे म्हणणे मान्य करत तिथेच मुक्काम करण्याचे ठऱवले. सनी साकेत नावाचा कामगार तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर रात्री 11 वाजता खोलीत घुसून जिवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. हा प्रकार तब्बल 22 दिवस सुरू होता. विशेष म्हणजे दिवसा महिलेकडून ढाब्यावरील काम करवून घेतली जात होती आणि रात्री तिच्यावर बलात्कार केला जात होता.

23 नोव्हेंबर रोजी जेवण बनवणाऱ्या लल्लू यादव याने सनी साकेतसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला. तीन दिवसानंतर ढाबा मालक प्रसाद पटेल यानेही तिच्यावर अत्याचार केला. 13 डिसेंबर रोजी महिले कशीतरी येथून सटकली आणि तिने घर गाठले. त्यानंतर पतीसोबत तिने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.