
भाजपचे कर्नाटकातील माजी मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तरुणीने आता आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओतून तिने आपल्या व आपल्या पालकांच्या जीवाला जारकीहोली यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले आहे. जारकीहोली हे तिला व तिच्या पालकांना मारायसाठी कोणत्यारी थराला जाऊ शकतात असा आरोप त्या महिलेने 4.27 मिनिटांच्या व्हिडीओतून केला आहे.
‘जारकीहोली यांनी मला धमकी दिली आहे. ते या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. ते सांगतात की त्यांनी मनात आणलं तर एका दिवसात राज्यातील सरकार पडेल. त्यासाठी त्यांना कितीही पैसा ओतावा लागला तरी चालेल. ते सगळ्यांना तुरुंगात धाडतील. याचा काय अर्थ आहे? ते काहीही करू शकतात. माझा व माझ्या आई वडिलांचा जीवही ते घेतील. मला आता हा मानसिक छळ सहन होत नाहीए त्यामुळे मी त्याच्या हातून मरण्यापेक्षा स्वत:चा जीव घेईन”, असे त्या महिलेने तिच्या व्हिडीओतून सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी सदर महिलेचे व जारकीहोली यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओत ती व तत्कालिन मंत्री रमेश जारकीहोली हे आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. त्यावेळी त्या महिलेने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या साहाय्याने जारकीहोली यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जारकीहोली यांनी जॉब देण्याचे आश्वासन देत माझा लैंगिक छळ केला अशी तक्रार तिने दिली होती.




























































