एक्स्प्रेसमध्ये चढते वेळी पर्समधील किमती ऐवजांची चोरी, बुलढाण्यातील चोर महिला गजाआड

मेल गाडीमध्ये चढते वेळी गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या पर्समधील किमती ऐवज शिताफीने चोरून पसार होणाऱ्या एका चोर महिलेस रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. बुलढाण्याच्या चिखली येथील राहणारी असलेल्या त्या महिलेने ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 16 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता भांडूप येथे राहणाऱ्या सुविधा पंगेरकर (66) या वृद्धा ठाणे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा उचलत त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात आरोपीने काढून नेले होते. या प्रकरणी पंगेरकर यांच्या तक्रारारीवरून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रेल्वे गुन्हे शाखेच्या युनीट-2ने गुन्ह्याचा संमातर तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीश शेख, निरीक्षक रुपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक होळकर, सहाय्यक फौजदार गजानन शेडगे, रवींद्र दरेकर, पेंजळे व पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा फुटेजमध्ये दिसणारी महिला ही बुलढाण्याच्या चिखली येथे राहणारी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चिखली गाठून पुनम भोसले (22) या महिलेला अटक केली.

फॅशन डिझायनरचा मोबाईल चोरणाऱ्याला अटक

फॅशन डिझायनर महिलेचा मोबाईल चोरी करणाऱ्याला वनराई पोलिसांनी अटक केली. संदीप ओमप्रकाश सिंग असे त्याचे नाव आहे. तक्रारदार महिला ही फॅशन डिझायनर असून ती तिच्या आईसोबत कांदिवली येथे राहते. 14 जुलैला रात्री ती तिच्या मित्राला भेटण्यासाठी कांदिवलीतील ग्रोवल मॉलजवळ रिक्षाने जात होती. ही रिक्षा महानंदा गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, महानंदा डेअरीजवळ आली असता मागून बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने तिच्या हातातील आयपह्न हिसकावून तेथून पलायन केले होते. तिने बाईकचा क्रमांक बघितला असता बाईकच्या मागील बाजूस नंबर क्रमांक नव्हता. घडलेला प्रकार तिने वनराई पोलिसांना सांगून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून दोन दिवसांपूर्वी संदीप सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने व त्याच्या मित्रानेच तिचा मोबाईल हिसकावून पलायन केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

डेबिट झालेले पैसे परत मिळवून देतो सांगून करायचे फसवणूक

बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून डेबिट झालेले पैसे परत मिळवून देतो असे सांगून एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. इजाज अहमद तुल्ला असे त्याचे नाव आहे. सय्यदने फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्याच बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती.  गोरेगाव येथे राहणारी तक्रारदार महिला राहते. फेब्रुवारी महिन्यात तिच्या बँक खात्यातून 236 रुपये डेबिट झाले होते. त्यामुळे तिने गुगलवर ऑनलाइन सर्च करून बँकेचा कस्टमर केअरचा एक मोबाईल प्राप्त केला होता. या मोबाईलवर संपर्क साधूनही तिला समोरील व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला एका अज्ञात व्यक्तीने पह्न करून तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तिला तिचे पैसे परत मिळवून देतो असे सांगून त्याने तिला बोलण्यात गुंतविले. तिला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अॅपवरून माहिती भरून देण्यास सांगून तिच्याकडून तिच्या बँक खात्याची माहिती मिळविली आणि फसवणूक केली.