सात मुलीनंतर मुलाचा हट्ट अंगलट, प्रसूतीत रक्तस्त्रावामुळे महिलेचा बाळासह मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

माजलगाव येथील रहिवासी असलेली मीरा रामेश्वर एखंडे या 38 वर्षीय महिलेला आठव्यांदा बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ऐनवेळी परिस्थिती गंभीर झाल्याने आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मीरा एखंडे हिला पहिल्या सात मुली आहेत तसेच दोन ते तीन वेळा गर्भपात देखील झालेले आहे. या वेळी ती गरोदर असताना तिला त्रास होऊ लागल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले. संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान तिला टेबलवर घेण्यात आले. प्रसूती होत असताना तिचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्या नंतर डॉक्टरांनी तिला उपलब्ध असलेले रक्त देखील देण्यास सुरुवात केली तरी देखील रक्त स्त्राव थांबत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रुद्रावर व डॉ. राजेश रुद्रावर तसेच येथे असलेल्या परिचरिकांनी तब्बल तीन तास मेहनत घेऊन देखील सदर महिला व तिच्या मुलाला वाचविण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील  नियतीने मात्र डाव साधल्याने परिसरात  हळहळ व्यक्त होताना दिसत होती तर सात मुलींच्या नंतर मुलगा असताना आई व मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचे ह्रदयद्रावक दृश्य या ठिकाणी पहावयास मिळत होते

तीन तासाच्या प्रयत्नाची शर्थ

सदर महिलेच्या प्रसूतीवेळी खूप मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला त्यामुळे बाळ आगोदरच दगावले होते परंतु महिलेला वाचविण्यासाठी रक्त देऊन देखील रक्तस्त्राव काही केल्या थांबत नसल्याने इतर डॉक्टरांची मदत घेण्यात आली मात्र तीन तास प्रयत्न करूनही आम्हाला यश आले नाही. – डॉ. गजानन रुद्रवार