माणसंच जास्त शिकवतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मुग्धा गोडबोले

जेव्हा आपलं काम आनंदाने करतो, तेव्हा ते जास्त चांगलं होतं आणि आपण इतरांनाही आनंद देतो. माणसंच जास्त शिकवतात! 

काही वर्षांपूर्वी एक पुस्तक मी वाचलं होतं, ‘द  फ्रेड  फॅक्टर.’ फ्रेड नावाचा एक पोस्टमन असतो, जो रोज लोकांच्या घरी पत्र पोहोचवण्याचं काम करत असतो आणि तो ते अत्यंत आनंदाने करत असतो. तसं म्हटलं तर त्याचं काम किती एकसुरी आणि पंटाळवाणं, पण आपण जेव्हा आपलं काम आनंदाने करतो तेव्हा ते जास्त चांगलं होतं आणि आपण इतरांनाही आनंद देतो. हा त्यातला मूळ मुद्दा होता आणि त्यानंतर माझ्या मनाला चाळा लागला, तो फ्रेड फॅक्टर लोकांमध्ये पडताळून बघण्याचा आणि एक दिवस माझ्या लक्षात आलं की, माझ्या घरी धुणीभांडी करायला येणारी सीमा, कचरा उचलायला येणारा राकेश, सोसायटी झाडायला येणाऱया मावशी, वॉचमन हे सगळे तसं म्हटलं तर ‘फ्रेड’च आहेत. यांच्यातल्या कुणालाही कदाचित आपलं काम हे फार सुखावणारं वाटत नसेल, पण रोज सकाळी ही मंडळी एक प्रसन्न चेहरा घेऊन माझ्यासमोर येतात आणि मला फार कौतुक  वाटतं त्यांचं. सीमा रोज सकाळी दारातून येताना शुभ्र पांढरे दात दाखवत हसते, आल्या आल्या उत्साहाने माझ्या घरातल्या कुत्र्याच्या पिल्लाशी खेळते. राकेश कचऱयाची बादली उचलताना न चुकता गुड मॉर्निंग म्हणतो, अत्यंत कौतुकाने  स्वतःच्या मुलाच्या शाळेबद्दल काहीतरी एखादं वाक्य बोलतो, सोसायटीचे वॉचमन मुलीचं लग्न कसं झालं, याच्या त्याच गोष्टी पुनः पुन्हा उत्साहाने सांगत राहतात आणि मग ही सगळी सकारात्मक ऊर्जा घेऊन मी दिवसभर काम करायला बाहेर जात असते. रिक्षा चालवताना राजकारणाबद्दल हिरीरीनं बोलणारे चालक, एक वस्तू घ्यायला गेलेलं असताना आवर्जून अजून दोन गोष्टी बघायला लावणारे दुकानदार, एकूणच आला क्षण आणि आपलं काम आनंदाने जगणारी माणसं मला फार आवडतात. हा ‘फ्रेड फॅक्टर’ने माझ्यात घडवलेला बदल.  थोडक्यात काय, पुस्तकांपेक्षा माणसं आपल्याला जास्त शिकवतात. एकूणच आजूबाजूची परिस्थिती पुरेशी विचित्र, त्रासदायक, अस्वस्थ करणारी, निराश करणारी अशी आहे. जगात युद्ध होतायेत, जागतिक संकटं येतायत, या सगळय़ात आपण आणि आपल्या आजूबाजूची माणसं मानसिकदृष्टय़ा सुदृढ राहणं अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वतः पुरतं आनंदी राहण्याचं व्रत अंगीकारलं तरी खूप फरक पडेल आणि याची सुरुवात आपण आपल्या कामाकडे कसे बघतो इथपासून होते. work is not just worship. work can be fun too.