
सामना प्रतिनिधी, बीड
मराठवाड्यात गेल्या 10 ते 15 वर्षाच्या काळात शेतीपूरक असा पाऊस पडलाच नाही, त्यामुळे पारंपारिक शेती बरोबर फळबाग लागवड आणि इतर उत्पादनासाठी शेतकरी चिंताजनक बनला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय करणे अवघड झाले आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊन कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेता यावे व रोहयो मार्फत विविध योजनाचा लाभ व्हावा, यासाठी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढारातून कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आहे.
मराठवाड्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळात शेतीपूरक असा पाऊस झालाच नाही. कुठे कमी तर कुठे अधिक ,त्यातही वेळेत न पडता परतीचा पाऊस झाल्याचा अनुभव आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पारंपरिक शेतीवर अनेक कुटुंबातील लोक अवलंबून आहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मोठा खर्च करणे परवडत नाही. शेतकऱ्यासाठी अशा परिस्थितीत वेगळी उपाययोजना राबवून त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या रोहयो व फलोत्पादन मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यापासून जयदत्त क्षीरसागर यांनी एक महिन्यातच विविध जिल्ह्यातील आढावा घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपाययोजना करता येतात का? यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरी, समपातळी चर, बांध, गायी म्हशींसाठी गोठा, तुती लागवड, कल्पवृक्ष फळबाग लागवड, समृद्ध गाव तलाव व जलसंधारण कामे, पुनर्भरण, अंकुर रोपवाटिका, ग्राम सबलीकरण समृद्ध योजनेत क्रीडांगण, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभित करणे, रस्ता करणे, ग्रामपंचायत भवन, गावांतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुकुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व योजना पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असा प्रयत्न जयदत्त क्षीरसागर करत आहेत. हे करत असताना कृषी विभागाला देखील यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना या सर्व बाबीची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन व्हावे यासाठी 12 ऑगस्ट रोजी बीड येथे वैष्णवी पॅलेस मोंढा रोड येथे भव्य मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा जगदीश काळे, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांनी केले आहे.


























































