
मुंबईतील कोळीवाडे आता पर्यटन स्थळे म्हणून विकसित होणार आहेत. यामध्ये कोळीवाडय़ात येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना वैशिष्टय़पूर्ण कोळी पदार्थांचा आस्वाद घेता येणार असून संस्कृती-परंपरेचे दर्शन घडणार असून राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी आणि माहीम-कोळीवाडय़ात उपक्रम सुरू केला जाणार आहे.
‘स्वच्छ-सुंदर मुंबई’साठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये महिलांसह गरजूंना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी विविध उपक्रमही सुरू करण्यात येत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कोळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोळीवाडय़ात ‘फुड कोर्ट’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. शिवाय कोळीवाडय़ांचा विकासही पर्यटनदृष्टय़ा केला जाणार आहेत. या ठिकाणी येणाऱ्या परदेशी पर्यटकांना राहण्याची व्यवस्थाही करण्याची परवानगी स्थानिक कोळी बांधवांना देण्यात येईल. दोन महिन्यांत याबाबतची कार्यवाही पूर्ण होणार आहे. दरम्यान, कोळीवाडय़ात मासे सुकवण्यासाठी ‘सोलर ड्रायर’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून दुर्गंधीचा प्रश्न मिटणार असून स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महालक्ष्मी येथील रेसकोर्सजवळ संपूर्ण मुंबईचे दर्शन घडवणारा ‘मुंबई आय’ प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहे. लंडनच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच रेसकोर्स परिसरातील मोकळय़ा जागांचा पर्यटनदृष्टय़ा विकास करून ही ठिकाणे कोस्टल रोडसह इतर रस्त्यांशी जोडली जाणार आहेत.
ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’
मुंबईत आधार नसलेल्या ज्येष्ठांसाठी पालिकेच्या माध्यमातून ‘डे केअर’ सेंटर सुरू केली जाणार आहेत. ब्रिटनच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गरज असलेल्या ज्येष्ठांना ‘डे केअर’ सेंटरपर्यंत नेण्यासाठी आणि सायंकाळी घरापर्यंत सुरक्षित आणून सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये किमान एक ‘डे केअर’ सेंटर सुरू केले जाणार आहे.
अशी होणार कामे
- स्कायवॉकसाठी सरकते जिने, लिफ्टची व्यवस्था
- फॅशन स्ट्रीटचा कायापालट करण्यासाठी उपक्रम
- मंडयांच्या स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबवणार
- मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांना आळा घालणार
- भिकाऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी धोरण

























































