
महाराष्ट्राच्या आखाडय़ात घाम गाळणाऱया अनेक गुणी मल्लांची स्वप्ने पैशाअभावी धुळीत मिसळतात. पण यापुढे निदान काही स्वप्नांना तरी कुस्ती सोडावी लागणार नाही. युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुढाकाराने खेडय़ापाडय़ातील होतकरू आणि गरीब गरजू कुस्तीगारांना मदतीचा हात दिला जाणार आहे. त्यांनी आपल्या पैलवान दत्तक योजनेतंर्गत 11 होतकरू कुस्तीपटूंच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.
या सोहळ्यात सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या 11 होतकरू पैलवानांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्य देऊन त्यांच्या स्वप्नांना उमेद देण्यात आली.
शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत मुलांची आर्थिक अडचण त्यांच्या यशाच्या आड येऊ नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले. सचिव दत्तात्रय जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेतून पैलवान दत्तक घेण्याची परंपरा आधुनिक काळात पुन्हा सुरू करण्याचा हा प्रयत्न असल्याची भूमिका मांडली. माजी हिंदकेसरी रोहित पटेल यांनी हा उपक्रम ग्रामीण कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.





























































