महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला अखेर यश आले असून, भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक पोक्सो कायद्यांतर्गत आहे. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करू असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिले होते.

भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. आरोपानंतरही बृजभूषण यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदही सोडले नाही.

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह सहाजणांनी 24 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण यांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून त्यांना अटक करा, तुरुंगात टाका. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा मागण्या याचिकेत केल्या. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी ‘दिल्ली पोलिसांकडून आजच बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल’, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे आता लवकरच बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री खेळाडूंचा फोनही उचलत नाहीत – पुनिया
बृजभूषण यांच्यावर एफआयआर नोंदविण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळाले, परंतु जोपर्यंत बृजभूषण यांना अटक करून तुरुंगात डांबले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार, असे कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले. महासंघांचा अध्यक्षच छळ करतो तेव्हा खेळाडूंनी कोणाकडे तक्रार करायची? केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे खेळाडूंचे फोनही उचलत नाहीत, अशी माहिती पुनियाने दिली.

आंदोलनामुळे देशाची प्रतिमा मलिन – पी. टी. उषा
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. त्यामुळे आंदोलन करण्याऐवजी कुस्तीपटूंनी आधी आमच्याकडे यायला पाहिजे होते. त्यांनी शिस्त बाळगली पाहिजे. पैलवानांच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, अशी भूमिका ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा, खासदार पी. टी. उषा यांनी मांडली. दरम्यान, पी. टी. उषा यांच्या प्रतिक्रियेवर कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. एक महिला आणि माजी खेळाडू म्हणून त्यांचे वक्तव्य निराशाजनक आहे, असे पुनियाने म्हटले आहे.

दिग्गज खेळाडूंचा कुस्तीपटूंना पाठिंबा
बृजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया कुस्तीपटूंना विविध क्रीडा प्रकारातील दिग्गज खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा, क्रिकेटपटू कपिल देव, हरभजन सिंग, इरफान पठाण, टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.

23 एप्रिलपासून ऑलिम्पिक कास्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह नामांकित पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले.