
>>आशुतोष बापट
छत्तीसगड राज्य म्हणजे भारताचे हृदय समजल्या गेलेल्या मध्य प्रदेशाचा एक भाग. पुढे या भागाचे स्वतंत्र राज्यात रुपांतर करण्यात आले. निसर्गसौंदर्य आणि बहरलेली आदिवासी संस्कृती यांनी छत्तीसगड नटला आहे. त्याचबरोबर खूप सुंदर अशा स्थापत्यवैभवानेसुद्धा हा प्रदेश सजला आहे. त्यातही बस्तर प्रांत म्हणजे या सगळ्याचा मुकुटमणी म्हणायला हवा. छत्तीसगडचा महत्त्वाचा प्रदेश आहे बस्तर. खरेतर बस्तर ही छत्तीसगडची खरी ओळख आहे. या राज्याचा दक्षिणेकडील हा भाग महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशाला लागून आहे. कुख्यात नक्षलवादी चळवळ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर फोफावली होती. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बस्तरची जुनी ओळख पुसली जाऊन ते आता एक मोठे पर्यटन स्थळ होऊ लागले आहे. निसर्गाची सर्वत्र मुक्तहस्ते झालेली उधळण, आजही जपली गेलेली इथली जनजाती संस्कृती, त्यांचे नृत्य, त्यांचे खाद्यपदार्थ आणि त्यांची कानाला गोड वाटणारी बोलीभाषा हे सगळे बस्तरचे वैभव आहे. गर्द हिरवाईने नटलेला हा प्रदेश तेवढाच समृद्ध आहे तो आदिवासी कला आणि संस्कृतीने. बस्तर प्रांत हिंडताना आदिवासी संस्कृतीचा निराळा पैलू बघायला मिळतो तो तिथल्या ग्रामीण बाज असलेल्या आठवडी बाजारात. जगदलपूरवरून दंतेवाडय़ाला जाताना वाटेत ‘तोकापाल’ नावाचं अगदी छोटेसे गाव लागते. या गावात आठवडी बाजार भरतो. आणि तोकापालच कशाला, बस्तरच्या प्रत्येक गावातच आठवडी बाजार भरत असतो. बाजार म्हणजे अनेकविध वस्तू, विविध रंग, आणि निरनिराळी माणसे यांनी भरलेली जणू जत्राच असते. अशा बाजाराच्या ठिकाणी मुद्दाम थांबून मनसोक्त हा बाजार हिंडायला हवा. आपणही त्या बाजाराचा एक भाग होऊन फिरायला हवे म्हणजे आपल्याला त्या संस्कृतीचे अंतरंग अगदी जवळून बघता येतात. छत्तीसगडच्या अनेक वाऱया झाल्या आहेत. त्यापैकी एका भटकंतीत हा तोकापालचा बाजार बघायची संधी मिळाली. बघायची म्हणण्यापेक्षा अनुभवायची संधी मिळाली असे म्हणावे लागेल. तोकापाल इथला बाजारसुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाकडचा आठवडी बाजार असतो तसाच होता. मात्र इथे आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू बघायला मिळाले. मुख्य म्हणजे त्यांच्या भाज्या, त्यांची वस्त्रs, कानाला गोड वाटणारी त्यांची बोलीभाषा आणि निरनिराळ्या आदिवासी जमातींचे लोक यांचा एक मेळाच तिथे भरला होता. नेहमीच्या भाज्या तर तिथे विकायला होत्याच त्या शिवाय निरनिराळ्या वस्त्रांची, आदिवासी वापरतात त्या वस्तूंची, आणि मोहाच्या फुलांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होत होती. मोहाची वाळलेली फुले, आदिवासी देवतांना अर्पण होणारी वस्त्र, चवरीसारख्या वस्तू, कवडय़ांनी मढवलेल्या टोप्या, सुट्टय़ा कवडय़ा, मध, हळद, आलं, लसूण, विडय़ाची पानं, सुके मासे, बांगडय़ा, निरनिराळी खेळणी, कपडे, बांबूच्या पट्टय़ांपासून केलेल्या टोपल्या, रोवळ्या, मोठमोठे लाल भोपळे, यापासून तयार केलेल्या वस्तूंना ‘तुंबा’ म्हणतात, अशा असंख्य वस्तूंनी तो बाजार सजला होता. गिऱहाईक आणि विकणाऱया बायका यांची दरावरून चाललेली घासाघीस असा सगळा कलकलाट इथेसुद्धा होता.
विक्रेत्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे स्त्रियांचे दिसत होते. पुरुष बहुदा मोहाच्या मोहात तल्लीन झालेले असावेत. अगदी मणिपूर, मिझोराम किंवा कंबोडिया इथल्या बाजारातसुद्धा सर्वाधिक विक्रेत्या या स्त्रियाच बघितल्या आहेत. या सगळ्या वस्तूंसोबत एक निराळा पदार्थ जो कधी दिसत नाही तो इथे दिसला, आणि तो म्हणजे ‘लाल मुंग्या!’ झाडाच्या पानाचा मोठा द्रोण केला होता आणि त्यात लाल मुंग्या खच्चून भरल्या होत्या. बस्तरचे आदिवासी लाल मुंग्या मोठय़ा आवडीने खातात. त्या नुसत्यासुद्धा खातात आणि त्याची चटणी तर या प्रदेशात फार लोकप्रिय आहे. या मुंग्यांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर प्रोटीन असते म्हणे.. असेलही… पण ही चीज पहिल्यांदाच बघितली. याचबरोबरीने बस्तरची कला म्हणून प्रसिद्ध असलेल्या धातूच्या वस्तू, मूर्ती, घंटा हेसुद्धा बाजारात विकायला ठेवले होते. आजूबाजूच्या गावातून लोक वडाप करून बाजाराला आले होते. सगळ्यांची खरेदी झाल्यावर आपापल्या वडापमध्ये बसून मंडळी आपापल्या वाडय़ा-पाडय़ांवर परतत होती. आजूबाजूला हिरवी शेती आणि त्याच्याच मध्ये गावात भरलेला हा बाजार फारच सुंदर होता.
इथल्या आठवडी बाजारात कोंबडय़ांची झुंज बघायला मिळते. ती काही दिसली नाही. कोंबडे मात्र मोठय़ा संख्येने विकायला होते. रंगीबेरंगी कपडे, डोक्यावर विशिष्ट रीतीने बांधलेली फडकी आणि इथल्या स्त्रियांच्या दोन्ही हातांवर क्वचित काहींच्या कपाळावर गोंदून काढलेली नक्षी हे सगळे दृश्य फार सुंदर होते. बस्तरच्या प्रत्येक आदिवासी जमातीची कपडय़ांची आणि गोंदण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यानुसार त्यांची जमात ओळखली जाते. इथे बाजारात सगळ्या जमातींचा मेळावा भरलेला होता. बस्तरच्या या सांस्कृतिक ठेव्याची अकस्मात भेट झाली. बरोबरच्या मंडळींनी जमेल तशी खरेदी करून घेतली. बाजाराचे आकर्षण कुणाला नसते. आणि त्यातून बस्तरच्या अशा दूरवरच्या एका छोटय़ाशा आदिवासी बाजारात जाण्याची संधी मिळाली तर मग काय विचारता! बाजारात खरेदी दुय्यम होती, पण तो बाजार बघणे, अनुभवणे, तिथल्या लोकांच्यात मिसळणे, त्यांची न समजणारी भाषा ऐकणे आणि त्या आदिवासी संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे हेच खूप मोठे समाधान तोकापालच्या बाजारात सगळ्यांना मिळाले. अकस्मात झालेली ही आदिवासी संस्कृतीची ओळख कायम लक्षात राहणारी ठरली.
अशा छोटय़ा छोटय़ा गावातून भरणाऱया बाजारात हिंडताना त्या भागातले लोकजीवन जवळून बघता येते. तिथली माणसेसुद्धा आपल्याकडे मोठय़ा कुतूहलाने बघत असतात. त्या लोकांशी जमेल तसा संवाद साधणे, त्यांना समजून घेणे हा एक विलक्षण अनुभव असतो. कुठल्याही भटकंतीमध्ये अशा लहान लहान गोष्टीतून मिळणारा अनुभव आणि आनंद हा अवर्णनीय असतो. तो शब्दात सांगता येत नाही. तो प्रत्यक्ष तिथे जाऊनच अनुभवायला हवा.


























































