
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र काही थांबताना दिसत नाही .उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणदरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने मी कर्जामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मृत शेतकरी फकिरराव चंद्रभान बोलके (वय 50) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बोलके यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती असून, त्यांच्या उपजीविकेचे शेती हे एकमेव साधन होते. मात्र शेतीवर उपजीविका भागत नसल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, तसेच शेतीवर घेतलेले कर्ज फेडण्यात अपयश येत असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे फकिरराव बोलके हे चिंताग्रस्त झाले होते. हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, शेती उत्पादनांना भाव नाही, अशी अनेक संकट समोर असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त झाले होते..
अखेर हताश होऊन त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. लोणवाडी गावात कष्टकरी शेतकऱ्यांची अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बोलके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे एक मुलगी आहे. शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक ढोमने यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित,जमादार किसन राठोड,समाधान नरवाडे यांना पाठवले पोफाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
गेल्या 23 वर्षात जवळपास साडे पाच हजार शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले . तर गेल्या 11 महिन्यात जवळपास 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे . पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असलेली ओळख आता ती पुसून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आता जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे .
जगाचा हा पोशिंदा जगला तर आपण जगू . शेतकरी आत्महत्या हा सरकारने केवळ आकडा म्हणून बघू नये . केवळ एक लाखाची मदत सरकारने केली तरी ती तोकडी आहे . घराचा कर्ता पुरुष गेला तर संपूर्ण कुटुंबच उद्वस्थ होण्याची भीती असते . प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडवाव्या . शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता सरकारने त्यांना मदत देऊन त्या सोबत पूरक असा जोडधंदा देणे अत्यंत गरजेचे आहे तरच कुठेतरी हे आत्महत्येचे सत्र थांबेल . हा प्रश्न राजकारणाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन सोडवावा लागेल अन्यथा जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी उद्वीगतेने मांडले




























































