
येरवडा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशातील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल दहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अजय मुक्तीलाल पवार (वय 28), अरविन सुखलाल सोलंकी (वय 28, दोघे मूळ रा. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवडा भागात अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे कर्मचारी गस्तीवर होते. या दरम्यान येरवडा भागात मध्यप्रदेशातील दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना पकडले.
त्यांच्याकडे केलेल्या तपासात दहा किलो 310 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघा आरोपींकडून गांजा, मोबाइल असा दोन लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




























































